देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य

    21-Jul-2025
Total Views |

महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते केवळ त्यांच्या पदामुळे नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे, दूरदृष्टीमुळे आणि धोरणात्मक निर्णयक्षमतेमुळे ओळखले जातात. अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते, भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस. त्यांना अनेकदा ङ्गमहाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्यफ असे संबोधले जाते आणि त्यामागे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील काही अत्यंत महत्त्वाच्या आणि चतुर चालींचा मोठा वाटा आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दि. 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हेदेखील एक नामवंत राजकारणी होते. लहानपणापासून रा. स्व. संघाच्या संस्कारांत वाढलेल्या फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरू केली. त्यानंतर ते नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, महापौर झाले आणि लवकरच विधानसभेत 27 वर्षांच्या वयात सर्वांत तरुण आमदार म्हणून त्यांनी प्रवेश केला.

2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात बहुमत मिळाले आणि फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्री होणारे ते विदर्भातील पहिले व्यक्ती ठरले आणि त्यांनी एक स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख शासन देण्याचा प्रयत्न केला. माझं गाव, माझं स्वप्न, जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी या उपक्रमांनी त्यांच्या कार्यकाळाला दिशा मिळाली. त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचार, मुत्सद्दीपणामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक कार्यदेखील प्रभावी आहे. त्यांचे कार्य म्हणजे, केवळ सरकारचे धोरण राबविणे नव्हे, तर राज्यातील विविध समाजांच्या कल्याणासाठी केलेले प्रयत्न, शेतकर्‍यांच्या हितासाठी असलेली धोरणे, तसेच सर्व समाजाचा विचार करून राज्यातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे होय. त्यांचा समाजसेवा आणि विकासासाठीचा दृष्टिकोन समग्र आणि समतामूलक आहे.

देवेंद्रजी राज्याच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण धोरणांची अंमलबजावणी करत आहेत. त्यांचा कार्यकाळ राजकारणातील पारदर्शकता, विकासाचे ध्येय आणि शिस्तप्रिय प्रशासनासाठी ओळखला जाईल, असा मला विश्वास आहे. त्यांचे मुख्यमंत्रिपद हे राज्याच्या प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी व राज्यातील विविध विभागांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध विकासकामे राबविली जात आहेत.

देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गफ असो किंवा वर्धा-गोंदिया रेल्वे, मुंबई मेट्रो प्रकल्प असो किंवा स्मार्ट सिटीफ योजना, बोरिवली-धारावी सिटी रिव्हायव्हलफ यांसारख्या अनेक योजनांमुळे राज्याच्या राज्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये आधारभूत सुविधांचा व्यापक विस्तार होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधला गेला आहे.
देवेंद्रजींच्या नेतृत्वात नवीन उद्योग व व्यवसायांच्या स्थापनेसाठी व्यापक उद्योग धोरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवनवीन उद्योग येत असून, रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य ही उपमा त्यांच्या राजकीय रणनीती, संपर्क कौशल्य आणि शत्रूला निष्प्रभ करणार्‍या चालींमुळे मिळाली आहे. 2019च्या निवडणुकांनंतरचे 80 तासांचे मुख्यमंत्रिपद व त्यानंतर घडलेला घटनाक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण. त्यांनी शिवसेनेसोबत संबंध तुटल्यानंतरही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयार झालेल्या राजकीय समीकरणांना धक्का दिला आणि त्यातून त्यांची राजकीय चतुराई अधोरेखित झाली.

फडणवीस हे अत्यंत संयमी आणि मुद्देसूद भाष्य करणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते आपल्या टीकाकारांना थेट उत्तर न देता, कामगिरीच्या माध्यमातून उत्तर देणे अधिक पसंत करतात. विरोधी पक्षनेता म्हणून असताना त्यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला.

ते तरुणांमध्ये लोकप्रिय असून, सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांना विकसनशील नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या भाषणशैलीत ठामपणा, मुद्देसूद मांडणी आणि परिणामकारक संवाद दिसतो.

देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे केवळ पदावर आधारित नाही, तर त्यांच्या वैचारिक स्थैर्यावर, रणनीतीवर आणि कणखर निर्णयक्षमतेवर आधारित आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचे ते खरे ङ्गचाणक्यफ मानले जातात, जे वेळ पडल्यास समोरच्याला शह देण्याची आणि योग्य वेळी योग्य चाल खेळण्याची क्षमता ठेवतात.

जरी हे सर्व असले, तरी मी माझ्या अनुभवातून व त्यांच्या लाभलेल्या सहवास व मैत्रीतून आवर्जून नमूद करू इच्छितो की, देवेंद्रजींचा स्वभाव अत्यंत मधुर, सुलभ आणि शीतल आहे. त्यांची सहनशीलता, विनम्रता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू आहेत. त्यांच्यामध्ये संवाद साधण्याची विलक्षण क्षमता आहे. ते एक उत्तम श्रोता आणि मार्गदर्शक असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना कोणतीही व्यक्ती सहजतेने आपली अडचण, मत व्यक्त करते व तत्क्षणी त्याच्या समस्येचा उपाय त्याला मिळतो, असा माझा अनुभव आहे. देवेंद्रजी हे प्रेरणा देणारे, संवेदनशील आणि भेदभाव न करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या सोबतची मैत्री म्हणजे मला लाभलेला एक अमूल्य ठेवा आहे.

राजकारणात असंख्य आव्हानांचा सामना करत असताना, देवेंद्रजी यांनी आपल्या शांत स्वभावाने अनेक प्रसंगांना तोंड दिले. संकटकाळात त्यांची सकारात्मकता नेहमीच समाधानाकडे नेण्यास मदत करते. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य हे महाराष्ट्राच्या विकासासाठी अनमोल ठरत आहे. त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या कामाचा सकारात्मक प्रभाव दिसत आहे. राजकारणात स्वच्छ प्रतिमा, स्पष्ट धोरणं आणि दूरदृष्टी असलेली माणसं विरळाच असतात, देवेंद्र फडणवीस हे त्यांपैकीच एक! दिशादर्शक नेतृत्व, राजकीय चाणाक्षपणा आणि धोरणांची अंमलबजावणीची क्षमता त्यांना एक प्रभावी नेता बनवते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सदैव प्रगती करत राहील!

गिरीष महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र