महाराष्ट्राचे विकासपुरुष : देवेंद्रजी फडणवीस

    21-Jul-2025
Total Views | 13

आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील त्यांना मानणार्या अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने, कार्यक्रमांतून त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. तथापि, कोणतेही पुष्पगुच्छ नको, फ्लेस नको, हारतुरे नको, त्याऐवजी रक्तदान करा, समाजोपयोगी कार्यक्रम करा, असा संदेश देवेंद्रजींनी दिला आहे. त्यामुळे मी आज त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे.


राजकारण हे असं माध्यम आहे, ज्यात सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याची ताकद आहे, या विचाराने महाराष्ट्रात गेली २५ वर्षे देवेंद्रजी फडणवीस काम करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या देवेंद्रजींनी नंतरच्या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. अगदी तरुण वयात नगरसेवक, महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे एक सक्षम, कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत त्यांनी अतिशय परिणामकारक आणि प्रामाणिकपणे केलेलं काम आपण पाहात आहोत.

१९९९ मध्ये देवेंद्रजींनी पहिल्यांदा विधानसभेचे आमदार म्हणून प्रवेश केला. त्यावेळी भाजप-शिवसेनेचं सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार राज्यात सत्तेवर आलं होतं. देवेंद्रजींना नगरसेवक, महापौरपदाचा चांगला अनुभव असल्याने, कायद्याचे पदवीधर असल्याने आणि जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असल्याने नवखे आमदार असूनही त्यांनी विधिमंडळ कामकाजात आपली छाप पाडली. विरोधात असताना त्यांनी शेतकरी आत्महत्या, विदर्भाचे प्रश्न, विभागीय अनुशेष, कुपोषण, तेलगी घोटाळा, सिंचन घोटाळा, ओबीसी समाजाच्या समस्या, क्रिमीलेअर उत्पन्न वाढवण्याची मर्यादा हे विषय अतिशय जोरकसपणे सभागृहात मांडले.

२०१३ साली त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपचं संघटन मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर जनजागरण करण्यासाठी मोठं काम केलं. २०१४ नंतर देवेंद्रजी फडणवीस यांच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला आणि भाजप-शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं आणि त्या सरकारचं नेतृत्व करण्याची संधी देवेंद्रजींना मिळाली.

देवेंद्रजी फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोठं आंदोलन राज्यात उभं राहिलं. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण, त्यातून काही साध्य झालं नाही, हे नंतरच्या काळात लोकांच्या लक्षात आलं. मराठा आंदोलनाची तीव्रता एवढी होती की, आंदोलन सुरू असताना विठ्ठलाच्या महापूजेचा मान फडणवीसांना मिळाला नाही. ‘महापूजेला आलात तर अंगावर साप सोडू,’ अशी त्यांना धमकी देण्यात आली होती. परंतु, देवेंद्रजी हे असं व्यक्तिमत्त्व आहे, जे त्यांच्याबद्दलची कुणीही, कधीही, कोणत्याही प्रसंगी व्यक्ती केलेली नकारात्मक भावना, टीका सकारात्मकपणे घेतात आणि आपल्या कार्यातून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी धडपडतात. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनीच सर्वप्रथम मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण दिलं, हाही इतिहास सर्वांना ज्ञात आहे.

देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांमुळे, केलेल्या पायाभूत विकासामुळे युतीला पोषक वातावरण होतं आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होता. परंतु, जनतेचा कौल अव्हेरला गेला आणि मा. उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली. अर्थात, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते झाले. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलं. जनतेचे अगदी बारीकसारीक प्रश्नांचा त्यांनी वाचा फोडलीच, पण ‘कोविड’ने झालेले मृत्यू आणि भ्रष्टाचार, अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन, नवाब मलिक या प्रकरणांवर सातत्याने त्यांनी सरकारला धारेवर धरलं. पुढे महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकलं नाही. एकनाथराव शिंदे हे वेगळे झाले आणि राज्यात एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं.

दि. ३० जून २०२२ रोजी राजभवनात एकनाथराव शिंदे यांचा शपथविधी होणार होता. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार असताना देवेंद्रजी फडणवीस यांच्याऐवजी एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा आणि त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनी सामील होण्याचा आदेश भाजप श्रेष्ठींनी दिल्यानंतर पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता कसा असू शकतो, याचं उदाहरण देवेंद्रजींनी देशाला घालून दिलं.

देवेंद्रजींनी राज्याचं नेतृत्व करीत असताना, भौतिक विकासाबरोबर सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या. आधुनिक शिक्षण, उद्योग क्षेत्राची वाढ, कृषी व कृषीआधारित उद्योग यासाठी घेतलेले निर्णय, सहकार चळवळीची जोपासना, उद्योग क्षेत्र केवळ शहरांपुरतं मर्यादित न राहता, ग्रामीण भागालाही औद्योगिक प्रगतीची फळं चाखायला मिळावीत, यासाठी पायाभूत विकासाच्या प्रकल्पांची केलेली उभारणी, अन्नसुरक्षा, पोषण आहार, शाश्वत शेती, सिंचन, आरोग्य, समावेशक शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, पाणी व स्वच्छता, शाश्वत ऊर्जा, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, औद्योगिकीकरण यासाठी धोरणं आखून त्यांच्या अंमलबजावणीचा प्रयत्न केलेला आपण सर्वांनी पाहिला आहे.

आपला देश आणि राज्य हे कृषिप्रधान आहे. आजही राज्यातील बहुतांश लोकसंख्या ही कृषी व संलग्न क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे राज्याचा विकास हा कृषी क्षेत्रातूनच पुढे जातो. कृषी क्षेत्रापुढे अनेक आव्हाने यापूर्वीही होती, आजही आहेत आणि आता त्यात ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची भर पडलेली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरात शाश्वत व परवडणारी शेती, यासाठीची धोरणं देवेंद्रजींनी आखली. एक उदाहरण द्यायचे झाले, तर जागतिक हवामानबदलामुळे अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले, दुष्काळी परिस्थितीही निर्माण होत आहे. २०३० नंतर जागतिक हवामानबदलाचा सर्वाधिक परिणाम शेतकर्यांच्या उत्पन्नावर होणार आहे, असे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाश्वत शेती, समृद्ध शेती’ हा मूलभूत मंत्र घेऊन त्यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या माध्यमातून गावे जलपरिपूर्ण करण्यावर भर दिला, शेतकर्यांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राज्यात राबवलं गेलं. हंगामाच्या तोंडावर शेतकर्यांना पैशांची आवश्यकता असते. त्यांना सरकारच्या माध्यमातून ठोक आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली. देवेंद्रजींनी यात भर घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये, असे वर्षाला १२ हजार रुपयांची रोख मदत सुरू झाली.

राज्यातील सर्वच पाणलोट हे आच्छादनविरहित व मोकळे झालेले असल्यामुळे पावसाळ्यात पाणलोटांमधून व शेतांमधून मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून नदी-नाल्यांमधून धरणांमध्ये जाऊन साठतो. त्यामुळे धरणांची साठवण क्षमता कमी होण्याबरोबरच शेतातून सुपीक जमिनीचा थर वाहून गेल्यामुळे उत्पादकताही कमी होते. या दोन्ही समस्यांचा अचूक वेध घेऊन देवेंद्रजींनी ‘गाळमुक्त धरण’ व ‘गाळयुक्त शिवार’ ही योजना राज्यात सुरू केली. ‘पोकरा’ हीदेखील एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमधून मराठवाडा, विदर्भ व खानदेश येथील १६ जिल्ह्यांतील हजारो गावांत वैयक्तिक लाभाच्या योजना, हवामानअनुकूल तंत्रज्ञान, शेती, शाळा, शेतकरी उत्पादक कंपन्या-गटांना अर्थसाहाय्य, हवामान अनुकूल वाणांचे बीजोत्पादन, मृद व जलसंधारण कामे हाती घेण्यात आली.
उत्पादन, उत्पादकता आणि निव्वळ उत्पन्नात वाढ, हे उद्दिष्ट समोर ठेवून देवेंद्रजींनी घेतलेल्या शेतकर्यांसाठीच्या योजना आज देशासाठीही आदर्श योजना ठरल्या आहेत.

देवेंद्रजी सातत्याने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची बनवण्याबाबत भरभरून बोलत असतात. त्यांनी आपल्या सरकारसाठी हे उद्दिष्टच ठरवून टाकलं आहे. त्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ उपक्रम आणि स्टार्टअपच्या माध्यमातून राज्यातील युवा पिढीने व्यवसायात उतरावं आणि नोकरी करणारा न राहता नोकरी देणारा व्हावं, यासाठी प्रोत्साहन दिलं. आज सांगायला अभिमान वाटतो की, येणार्या काही काळात महाराष्ट्र हे देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ होण्याच्या मार्गावर आहे.

देवेंद्रजींनी ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ला आपल्या सरकारच्या धोरणाचा भाग बनवलं. उद्योगांसाठी लागणार्या परवानग्यांची संख्या कमी केली, त्यामध्ये ‘वन विंडो सिस्टम’ आणली. त्याचा परिणाम म्हणून मधला काही काळ सोडला, तर राज्य सतत परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहिले आहे.

देवेंद्रजींनी ज्यावेळी समृद्धी महामार्गाची घोषणा केली, त्यावेळी या महामार्गाची काय आवश्यकता आहे, इथपासून विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याचे हे कारस्थान आहे, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. पण, राज्यासाठी मोठी स्वप्न पाहणार्या देवेंद्रजींनी हा महामार्ग मुदतीत पूर्ण केला. या महामार्गाशी राज्यातील २६ जिल्ह्यांना जोडण्याचं काम केलं. खर्या अर्थाने राज्याला समृद्धीच्या मार्गावर नेणारा हा महामार्ग आहे, अशा प्रकारचं कौतुक नंतरच्या काळात अनेक धुरिणांनी केलं.

मराठवाड्यासारख्या कायम दुष्काळी भागातील दुष्काळ कायमचा नष्ट व्हावा, यासाठी देवेंद्रजींनी आखलेली ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’सारखी योजना या भागाचं भविष्य बदलवणारी ठरणार आहे, यात आता कुणालाही शंका राहिलेली नाही.

राज्यात सर्वसामान्य माणसाचा प्रवासातील त्रास दूर झाला पाहिजे, यासाठी विशेषतः मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये मेट्रोचं जाळं तयार करण्यात देवेंद्रजी यशस्वी ठरले आहेत, असे म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा प्रवास सुखकर तर होणार आहेच, पण वाहनांमधून उत्सर्जित होणार्या कार्बनचं प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचं रक्षणही होणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, कोस्टल रोड असेल, नवीन पूल, रस्ते, ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्गाचं कामं, अशा पायाभूत विकासाच्या बाबतीत आमूलाग्र परिवर्तन देवेंद्रजी यांच्या काळात झाल्याचं प्रत्यक्षात आज दिसून येत आहे.

वाढवण बंदर हा महाकाय प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात साकारत आहे. राज्याला काही दशकं पुढे घेऊन जाणारा हा प्रकल्प आहे. यातून अनेक ‘अॅसिलरी उद्योग’ उभे राहणार आहेत, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत, राज्याची अर्थव्यवस्था विस्तारणार आहे आणि राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.
राजकारणात अशी काही नेतृत्व घडतात, जे गरीब, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणतात. आज राज्याच्या राजकीय पटलाचा मध्यबिंदू असलेले देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस, सर्वांचे ‘देवाभाऊ’ हे यातीलच एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

आई जगदंबेला एकच प्रार्थना आहे. राज्यातील सर्व घटकांसाठी जे अहोरात्र धडपडत आहेत, अशा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, देवाभाऊंना शक्ती दे! वाढदिवसाबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लक्ष लक्ष शुभेच्छा.

प्रविण दरेकर, आमदार - गटनेते, विधान परिषद

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121