‘महाराष्ट्र विना राष्ट्रगाडा न चाले’ या थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांच्या ओळी महाराष्ट्राचे देशातले महत्त्व नेमकेपणाने अधोरेखित करतात. महाराष्ट्र म्हणजे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. देशातील आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक विचारांचे उगमस्थान आहे. या महाराष्ट्राची महती ज्या मोजया नेत्यांना कळली आहे, त्यामध्ये मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे नाव अग्रस्थानी आहे. संघटनेवर परमोच्च श्रद्धा, कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याची ताकद, कधीही न ढळणारा संयम, अर्थशास्त्र, कायदा, संविधान या क्षेत्रांचा व्यासंग आणि विकासाची दूरदृष्टी, या गुणांचा समुच्चय देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये झालेला दिसतो.
महाराष्ट्र हे देशातले सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर ग्रामीण भागासोबत शहरी भागाकडेही लक्ष द्यायला हवी, याची नेमकी जाणीव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आहे. त्यामुळेच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून शहरांच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय त्यांनी धडाडीने घेतले. १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ची स्थापना असो किंवा २००८ पासून चर्चेत असणारी मेट्रो, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या रखडलेल्या कामांना मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. देवेंद्रजींच्या धडाडीच्या विकासदृष्टीचे हे ठळक उदाहरण आहे.
पुणे शहरावर देवेंद्रजींचे विशेष प्रेम आणि लक्ष असल्याचा अनुभव मी नगरसेवक, महापौर आणि आता खासदार म्हणून त्यांच्यासोबत काम करताना जवळून घेतला आहे. पुणे शहरात देवेंद्रजी कधीही आले, तरी सर्वप्रथम त्यांच्या बैठकांमध्ये पुण्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा सर्वांत आधी घेतला जातो. पुणे मेट्रो, नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प, रिंग रोड, पाणीपुरवठा योजना या विकासकामांबद्दल देवेंद्रजींना असणारी तांत्रिक माहिती आणि बारकावे हे थक्क करणारे आहेत. मुख्यमंत्री म्हणून राज्याची जबाबदारी सांभाळत असताना वर्षातले ३६५ दिवस आणि दिवसातले २४ तास त्यांना कमीच पडत असावेत. सततचे सरकारी दौरे, अधिकार्यांच्या बैठका, प्रशासकीय निर्णय, धोरणात्मक बैठका चालू असताना, देवेंद्रजींना त्यांच्यासमोर येणार्या प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी वेळ कसा मिळतो, असा प्रश्नच आमच्यासारख्यांना पडतो.
पण, याचे उत्तर कदाचित देवेंद्रजींच्या राजकीय जडणघडणीत दडलेले असावे. नगरसेवक पदापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात देवेंद्रजींनी महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री अशा जबाबदार्या पार पाडलेल्या आहेत. या जबाबदार्या पार पाडताना देवेंद्रजींना पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई अशा विविध शहरांचे प्रश्न समजून घेता आले. त्यामुळेच आज मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास कसा करायचा, याचे ‘व्हिजन’ त्यांच्याकडे तयार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्रजी तेवढाच वेळ कार्यकर्त्यांनाही देतात. गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत त्यांच्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरलेले आहे. कार्यकर्त्यांच्या मनातली अस्वस्थता ते अचूक ओळखतात, वेळप्रसंगी समजूत काढतात. अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा नेता, कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा नेता ही त्यांची ओळख संबंध महाराष्ट्राला माहिती आहे.
देवेंद्रजींचा राजकारणातला उमदेपणा संबंध महाराष्ट्राने वेळोवेळी अनुभवला आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी कधीही ‘आपले’ आणि ‘परके’ असा भेदभाव केलेला नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांना मदत करताना कधीही दुजाभाव केलेला नाही. पातळी सोडून टीका केलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षातले नेतेही देवेंद्रजींबद्दल आदर बाळगतात. देवेंद्रजींच्या नेतृत्वाची स्वीकार्हता यामुळे विस्तारली आहे.
महाराष्ट्राची स्वतःची अशी राजकीय संस्कृती आहे. ही संस्कृती टिकवण्याची जबाबदारी देवेंद्रजींनी मोठ्या कुशलतेने सांभाळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातल्या कठीण प्रसंगांतही कधीही संयम ढळू दिलेला नाही. मधल्या काळात त्यांना पराकोटीच्या जातीय टीकेला सामोरे जावे लागले. पण, ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ या उक्तीनुसार देवेंद्रजींनी हे सगळे सहन करत आपल्या कामातून विरोधकांना उत्तर दिले. आमच्यासारखे कार्यकर्ते अशा उदाहरणातूनच शिकत असतात.
‘पक्षाचा कार्यकर्ता नेता झाला पाहिजे’ याकडे देवेंद्रजींचा कटाक्ष असतो. कार्यकर्त्यांच्या अंगी असलेले गुण हेरणे त्यांना प्रोत्साहन देणे आणि या गुणांचा संघटनावाढीसाठी सुयोग्य पद्धतीने वापर करून घेणे, यामध्ये देवेंद्रजींचे द्रष्टेपण दिसून येते. त्यामुळे भाजपमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा निश्चिंत असतो.
माझ्या बाबतीत म्हणाल, तर मला देवेंद्रजींनी राजकारणात आणि वैयक्तिक आयुष्यातही कायम प्रत्येक प्रसंगात साथ दिली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी मोठी तयारी केली, पण तिकीट मात्र मला मिळाले नाही. ‘संघटना आधी, आपण नंतर’ या संस्कारात वाढलो असल्याने पक्षनिष्ठा अर्थातच अचल होती. पण, देवेंद्रजींनी त्यावेळी स्वतः माझ्याशी संवाद साधला आणि माझी समजूत काढली. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाल्यानंतर देवेंद्रजींनी पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी सोपवत माझ्यावर विश्वास टाकला. २०२४ साली खासदारकीची जबाबदारी आणि पहिल्याच टर्ममध्ये मिळालेली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी, या सगळ्याच घडामोडींमध्ये देवेंद्रजींचा मला कायम आशीर्वाद होता, याची मला कायम जाणीव राहील.
२०२०च्या ‘कोविड’च्या संकटात जेव्हा पुणे शहराचा महापौर या नात्याने लोकांमध्ये जाऊन काम करत होतो, त्यावेळी मला ‘कोविड’ची लागण झाली. या कठीण प्रसंगात देवेंद्रजींनी मला फोन करून माझी जिव्हाळ्याने विचारपूस केली. देवेंद्रजींना त्यावेळेला माझ्याबद्दल वाटणारी काळजी त्यांच्या आवाजातून आणि शब्दांतून स्पष्टपणे जाणवत होती. कार्यकर्त्यांना कुटुंबाचाच भाग मानणारा ‘खरा कुटुंबप्रमुख’ कसा असतो, हे देवेंद्रजींनी त्यावेळी दाखवून दिले. काही क्षण हे राजकारणापलीकडे असतात, हा प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे, जो मी कधीही विसरू शकत नाही.
महाराष्ट्र आज विकासाच्या ऐतिहासक टप्प्यावर उभा आहे. अशा वेळी महाराष्ट्राची सूत्रे देवेंद्रजींच्या हाती असणे, हा एक भाग्ययोग म्हणायला हवा. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणांची आखणी करण्यात आली. ’जलयुक्त शिवार’सारख्या योजनेतून त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दूरगामी पावलं उचलली. ग्रामीण महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा झाला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा त्यांच्या दूरदृष्टीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून देवेंद्रजींनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यामुळे अनेक परदेशी कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आणि तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या.
महाराष्ट्राला देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, जो महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाच्या वाटेवर घेऊन जाईल. देवेंद्रजींना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.