मुंबई : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवार, १ जुलै रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम भदाणे, आ. अनुप अग्रवाल, आ. मंगेश चव्हाण, आ. राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल सैंदाणे, बाजीराव हिरामण पाटील, योगेश पाटील, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, शकील अहमद, उबाठा उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, विलास चौधरी, ललित माळी, हरिष माळी, डॉ. भरत राजपूत आदींनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "कुणाल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना भाजप संघटनेकडून संपूर्ण साथ मिळेल," असे त्यांनी सांगितले.
कुणाल पाटील यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - रवींद्र चव्हाण
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, कुणाल पाटील यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे धुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवणार
कुणाल पाटील म्हणाले की, "गेली सुमारे ७५ वर्षे माझे कुटुंब काँग्रेसबरोबर आहे. खानदेश भागाच्या विकासासाठीच अनेक वर्षांचा काँग्रेसबरोबरचा संबंध तोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय मी घेतला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून खान्देशच्या विकासाचे मनमाड–इंदूर असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. भाजप सरकारकडून विकासाच्या बाबतीत भेदभाव केला जात नाही, असा अनुभव आहे. आगामी काळात धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.