वसई-विरार: (287th Vasai Vijayotsav Din) वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
प्रथेप्रमाणे सकाळी ०७.०० वाजता वज्रेश्वरी देवी मंदिर, वज्रेश्वरी येथे मशाल पूजन करून मशाल यात्रा प्रारंभ झाली. अग्निशमन विभागाच्या विशेष वाहनातून व बाईकस्वारांच्या सोबतीने वज्रेश्वरी हून निघालेली मशाल यात्रा राष्ट्रीय महामार्ग - वसई फाटा – वालीव नाका – गोखीवरे नाका – चिमाजी अप्पा उद्यान, नवघर पूर्व – माणिकपूर येथून पारनाका येथे पोहोचल्यावर या मशाल यात्रेत ढोल-ताशा पथक, लेझीम पथकांच्या जल्लोषपूर्ण गजरात मशाल यात्रा वसई किल्ल्यापर्यंत काढण्यात आली. यावेळी विविध पारंपारिक वेशभूषेत मान्यवर नागरिक, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झाले. मोठ्या जल्लोषपूर्ण व ऐतिहासिक वातावरणात ही मशाल यात्रा नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वसई किल्ला, वसई गाव येथे संपन्न झाली.
मशाल यात्रा संपन्न झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नरवीर चिमाजी अप्पा स्मारक पुजन व नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गौतम बुद्धांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पअर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांमार्फत पहलगाम येथील हल्ल्यात निधन झालेल्या व्यक्तींना तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा महानगरपालिकेमार्फत सत्कार करण्यात आला व उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात येऊन कार्यक्रम संपन्न झाला.
अवकाळी पडलेल्या पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वसई किल्ला, वसई गाव येथील परिसर चिखलमय झाल्यामुळे ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ निमित्त आयोजित करण्यात येत असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले होते व हा कार्यक्रम तीन दिवसांऐवजी एक दिवसीय करण्यात आला होता. तरीही या एक दिवसीय कार्यक्रम मोठ्या जल्लोषात व ऐतिहासिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार श्री.राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, प्रांताधिकारी तथा उप विभागीय अधिकारी शेखर घाडगे,तहसीलदार अविनाश कोष्टी, माजी महापौर राजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर, माजी उप-महापौर प्रकाश रॉड्रीग्ज, वसई विजय स्मारक समितीचे पदाधिकारी, मनपाचे माजी नगरसेवक व नगरसेविका, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.