मुंबई,दि.८ : प्रतिनिधी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. श्रीनिवास यांनी गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला असून ते १९९१ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
एस.व्ही.आर.श्रीनिवास यांना २० वर्षांहून अधिककाळ भारतीय प्रशासकीय सेवेशी संबंधित नगर संरचना, शहरी वाहतूक, मेट्रो रेल्वे आणि नगर नियोजन या विभागांचा अनुभव आहे. त्यांनी बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यामध्ये वरिष्ठ पदे भूषविली आहेत. सध्या श्रीनिवास हे धारावी पुनर्वकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
विजय सिंघल यांची केवळ नऊ महिन्यात फेब्रुवारी २०२४मध्ये त्यांची सिडकोमध्ये बदली झाली. त्यानंतर बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी मार्च २०२४मध्ये अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी यांची बदली करण्यात आली. त्यानंतर काही दिवस महाव्यवस्थापक पद रिक्तच होते. त्यानंतर डॉ. हर्षदीप कांबळे यांची महाव्यवस्थापक पदावर नेमणूक झाली. मात्र कांबळे यांनी महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला नव्हता. अखेर या पदाचा कारभार एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी स्वीकारला आहे.