संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले जाणार?
18-Jan-2025
Total Views | 59
बीड : (Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सहा संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु न्यायालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांना न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात येण्याची शक्यता आहे.
यामध्ये आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे या सहा जणांचा समावेश आहे. तसेच यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या आरोपींपैकी सुधीर सांगळे सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलिस कोठडीत आहेत. तर जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार हे गेवराई पोलिस कोठडीत आहेत. या दोन्ही पोलिस कोठडीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या आरोपींना सुनावणीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी
दरम्यान, मस्साजोग येथील आवादा कंपनीकडून २ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी १४ जानेवारीच्या सुनावणीत केज न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र यानंतर लगेच कराडच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी एसआयटीने न्यायालयाला कराडला जामीन देऊ नये, अशी विंनती केली आहे. त्याला जामीन मिळाला तर तो या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करू शकतो, असा युक्तीवाद एसआयटीकडून करण्यात आला आहे.