'नवरा माझा नवसाचा'मधील व्हिजेच्या भूमिकेचा खास किस्सा, मधुराणी म्हणाली, "मी स्वत:च सचिन सरांकडे..."

    05-Aug-2024
Total Views |

prabhurani  
 
 
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने आजवर मालिका, चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आई कुठे काय करते या मालिकेत तिने अगदी साधा, सरळ स्वभाव आणि काहीही करून दाखवण्याची जिद्द असलेल्या अरुंधतीची भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांना भावली. पण १९ वर्षांपुर्वी मधुराणीने अरुंधतीच्या उलट भूमिका 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात साकारली होती. यात ती व्हिजेच्या भूमिकेत दिसली होती. आता 'नवरा माझा नवसाचा २'च्या निमित्ताने मधुराणीने तिच्या त्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.
 
'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात कंडक्टर लालूच्या अर्थात अभिनेते अशोक सराफ यांच्या बाजूला बसून हातात ब्रश घेऊन प्रवास करणाऱ्या व्हिजेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. 'नवरा माझा नवसाचा' मध्ये मधुराणीला ही भूमिका कशी मिळाली याबद्दल तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिले आहे. मधुराणी म्हणाली, "मी मुंबईत आले तेव्हा अनेक स्वप्न उराशी घेऊन आले होते. त्यावेळी मी एक मालिका केली होती. त्यानंतर लगेचच मला 'नवरा माझा नवसाचा'सारखा चित्रपट मिळाला. मी स्वत: सचिन सरांकडे गेले होते. त्यानंतर व्हिजे ही भूमिका मला मिळाली. या भूमिकेसाठी मी जे इंग्रजी बोलले तसं इंग्रजी माझ्या बहिणीची मुलगी म्हणायची. तेच मी माझ्या भूमिकेसाठी वापरलं. पहिल्याच दिवशी मी सीन दिला तेव्हा सचिन सरांनाही ते आवडलं होतं. संपूर्ण चित्रपटात मी तीच भाषा बोलले आहे", असं मधुराणी म्हणाली.
 
या चित्रपटात व्हिजे हे पात्र साकारणाऱ्या मधुराणीच्या हाताता केसांचा ब्रश होता जो ती तिचा माईक म्हणून वापर करत होती. याबद्दल खुलासा करताना ती म्हणाली की, "माईक म्हणून मी जो हेअरब्रश वापरला होता तो मी स्वत: दादरला जाऊन माझ्या हातात मावेल असा घेतला होता. अशोक मामांच्या बाजूला बसून काम करण्यासाठी मला फारच दडपण आलं होतं. लहानपणी त्यांचे सिनेमे बघणे ते त्यांच्याबरोबर काम करणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एवढी मोठी कलाकार असूनही त्यांनी मला सांभाळून घेतलं. जेव्हा रीमाताईंची एन्ट्री झाली. तेव्हा मी त्यांच्याकडे बघतच बसले. सोनू निगमसारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करणं. म्हणजे इंडस्ट्रीत येताच माझ्यासमोर पंचपक्वानांचं ताट वाढल्यासारखं झालं होतं. सुप्रियाताई-सचिन सर खूप सपोर्टिव्ह आहेत". "ज्यावेळी आई कुठे काय करते ही मालिका आली. तेव्हा मीच 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हिजे आहे, हे लोकांनी ओळखलं. 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये मी नाही आहे. पण, यानिमित्ताने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या", असंही मधुराणी यावेळी म्हणाली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121