दुसर्याच्या वाटेत काटे पेरून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, तर त्या काट्यांवरून चालण्याची वेळ स्वतःवरही कधीतरी येते, असे म्हणतात. त्याने पाय रक्तबंबाळ होतातच, शिवाय समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. शरद पवार हे त्याचे ताजे उदाहरण. आंतरवली सराटीमध्ये सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला खतपाणी घालून महायुती सरकारच्या विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या वाटेत काटे पेरण्याचा प्रयत्न झाला. हे आंदोलन भडकवण्यासाठी कोणाच्या कारखान्यावर बैठक झाली? कोणी दगड पुरवले? दगडफेक करायला कोणी सांगितले? छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नवी मुंबईत ‘सोशल मीडिया वॉर रूम’ कोणी सुरू केल्या? हे ’एसआयटी’च्या अहवालातून समोर येईलच. पण, त्याआधी ’खर्या’ आंदोलकांचे डोळे उघडू लागल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळालेले दिसते. मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन मधल्या काळात इतक्या टोकाला पोहोचले की, राजकारण्यांना थेट गावबंदीच करण्यात आली. पण, त्याला शरद पवारांचे गोतावळे अपवाद. म्हणजे, रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला गावागावांत प्रवेश मिळतो, स्वागत सोहळे होतात; पण इतरांसाठी वेशी बंद केल्या जातात. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडेंना प्रचारबंदी, तर विरोधी उमेदवाराला हारतुर्यांचा सन्मान. यामागील राजकारणाचा अर्थ हळूहळू सर्वसामान्यांना कळू लागलाय. त्यामुळेच की काय, आता आंदोलनप्रमुखांनी स्वतःचे पितळ उघडे पडू नये, म्हणून पवारांना तोंडदेखले टार्गेट करायला सुरुवात केल्याचे दिसते. ’शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले’, असे शब्द नाइलाजाने का होईना, त्यांच्या मुखातून बाहेर पडले. आरक्षणतिढा सोडवण्यासाठी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मविआच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दांडी मारली. त्यामुळे विरोधकांना मराठ्यांची किती चिंता आहे, याची प्रचीती आंदोलकांना आली. त्यांनी सत्ताधार्यांसोबतच विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही जाब विचारण्यास सुरुवात केली. गाड्या अडवायच्या, सभास्थळी आंदोलन करायचे, भाषण सुरू असताना स्टेजवर चढून मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करायला लावायची, असा कार्यक्रम सुरू असल्यामुळे आंदोलन हातून निसटू नये, याची धास्ती आंदोलनप्रमुखांना आहेच. त्यातूनच त्यांची जीभ पवारांवर घसरली. पण, येत्या काळात त्यांनी ’टार्गेटेड’ भूमिका सोडली नाही, तर जनभावनेचा उद्रेक होईल, हे निश्चित!
असंवेदनशील ‘ताई’
हिरव्या पिलावळींची भलामण करणार्या ममता बॅनर्जींच्या राज्यात एका डॉक्टर मुलीवर अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावरील प्रत्येक अवयवावर घाव घालण्यात आला. पाय तोडले, हातांची बोटे छाटण्यात आली. या घटनेवर संपूर्ण देश हळहळ व्यक्त करीत असताना, सुप्रिया सुळे यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला. “अशा घटना देशात घडत असतात, आमच्या ममता बॅनर्जी खूप संवेदनशील आहेत, त्या यावर कडक कारवाई करतील,” अशी जुजबी प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त पीडित भगिनीप्रति सहवेदना व्यक्त करण्याची माणुसकीही त्यांनी दाखवली नाही. सर्वसामान्य कुटुंबातील या भगिनीवर अमानवी अत्याचार करून हत्या झाली. पण, पाषाणहृदयी ममता बॅनर्जींच्या काळजाला पाझर फुटेना. शेवटी, जनता रस्त्यावर उतरल्यामुळे त्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तरीदेखील, सुप्रियाताईंना ममतादीदींचे कौतुक करावेसे वाटते, ही चीड आणणारी बाब. अमलीपदार्थ प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा तुरुंगात होता, तेव्हा सुप्रियाताईंना झोप लागत नव्हती, आई म्हणून त्याची काळजी वाटत होती. मग, आता त्यांच्यातील मातृत्वाची माया का आटली? त्यांनी आता माणसाची जात आणि धर्म पाहून राजकारणाची पोळी भाजण्याचे धंदे बंद करावे. जसा ताईंना शाहरूखच्या मुलाचा पुळका, तसाच वक्फ बोर्डाबद्दलही. वक्फअंतर्गत येणार्या मालमत्तांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करण्याचे ठरविले आहे. त्याला सुप्रियाताईंचा विरोध. म्हणे, हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. पण, ते कसे संविधानविरोधी आहे, यावर भाष्य करण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. देशातल्या कोणत्याही जमिनीवर मालकी सांगणार्या नापाक मनोवृत्तीविरोधात बोलायची त्यांची हिंमत होणार नाही, कारण हिरवी मते नाराज होतील. लांगूलचालनाच्या नादात देशविघातक प्रवृत्तींना बळ मिळतेय, हे त्यांच्या कधी ध्यानी येईल, दैवच जाणे. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला विचारूनच वक्फ बोर्डाबद्दल निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. मग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर इस्लामी अतिक्रमणे वक्फ बोर्डाने सरकारला विचारून केली आहेत का? याचेही उत्तर सुप्रियाताईंनी द्यावे.