पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या घटस्फोटाबाबत एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे. केंद्र सरकारने पुणे पोलिसांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता पोलिसांनी यासंदर्भात एक अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
पुणे पोलिसांनी खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटासंदर्भात दहा पानांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात २०१० मध्ये कुठल्याही अटी शर्थीशिवाय त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा खेडकर यांनी आपल्या आईवडीलांचा घटस्फोट झाल्याचे कागदपत्र सादर केले होते. पण दुसरीकडे, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केल्याची माहितीही पुढे आली होती. त्यामुळे पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी घटस्फोटाचे खोटे कागदपत्र दिलेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.