मुंबई : मायक्रोसॉफ्ट क्लाउडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील सर्व बँका, व्यवसाय, विमान कंपन्या या क्लाउड सर्व्हरवर अवलंबून आहेत. मायक्रोसॉफ्ट क्लाउड डाऊन झाल्यामुळे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
एअरलाइन्स कंपन्यांनी त्यांच्या प्रवाशांना याबाबत माहिती दिली. बहुतेक कंपन्या क्लाउड सर्व्हर वापरत आहेत. जगात तीन मोठ्या कंपन्या क्लाउड सेवा प्रदान करत आहेत ज्यात मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि गुगल यांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्ट क्लाउड ठप्प झाल्यामुळे अनेक क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम झाला.
भारतात इंडिगो, स्पाईसजेट आणि आकासा एअरलाइन्सच्या सेवेवर परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्ट क्लाउड आउटेजमुळे भारताव्यतिरिक्त अमेरिकेतील फ्रंटियर, एलिजिअंट आणि सनकंट्री सारख्या मोठ्या विमान कंपन्यांच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. तांत्रिक अडचणीमुळे विमान कंपन्यांच्या बुकिंग, चेक-इन, बोर्डिंग, वेब चेक-इन या सर्व सेवांवर परिणाम झाला आहे.
मायक्रोसॉफ्ट क्लाऊड आउटेजमुळे जगातील अनेक बँकांचे कामही ठप्प झाले आहे. याशिवाय क्लाऊडवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. अनेक मीडिया हाऊसच्या वेबसाईटही डाऊन झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक व्यवसायांचे आयटी नेटवर्क प्रभावित झाले आहे.
वास्तविक, हा आउटेज थेट मायक्रोसॉफ्टमुळे नाही तर मायक्रोसॉफ्ट पीसी आणि अनेक कंपन्यांना सायबर सुरक्षा सेवा पुरवणारे प्लॅटफॉर्म CrowdStrike च्या डाऊन झाले आहे. CrowdStrike Windows PC ला प्रगत सायबर सुरक्षा उपाय प्रदान करते. CrowdStrike डाऊन झाल्यामुळे भारत, अमेरिका, कॅनडा, जपानसह जगभरातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. CrowdStrike ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फाल्कन सेन्सरशी संबंधित विंडोज होस्ट्सवरील क्रॅशच्या अहवालांबद्दल त्यांना माहिती आहे आणि त्याचे अभियंते सेवा पूर्ववत करण्यासाठी काम करत आहेत.