‘इशारा’ तुला कळला ना!

    17-Jul-2024
Total Views | 56
bangladesh govt quota system


बांगलादेशमध्ये सध्या सरकारी नोकरीतील ‘कोटा सिस्टीम’विरोधात जनक्षोभ उसळून आला आहे. या ‘कोटा सिस्टीम’विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने आणि निदर्शने सुरु आहेत. अशीच निदर्शने करत असताना, या सिस्टीमचे समर्थक आणि त्याच्याविरोधात असणार्‍या गटामध्ये धुमश्चक्री झाली. या झालेल्या धुमश्चक्रीमध्ये सहा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ४०० जण जखमी झाले. यानंतर, बांगलादेश सरकारने संपूर्ण बांगलादेशात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे फर्मान जारी केले. या आंदोलनामु़ळे सध्या एकूण बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीवरून रण पेटले आहे.

बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीमध्ये ‘कोटा सिस्टीम’ची पद्धत आहे. यामध्ये समाजातील विविध घटकांसाठी काही विशिष्ट कोटा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांसाठी दहा टक्के कोटा निर्धारित केला असून, अल्पसंख्याक समाजासाठी पाच टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे, तर बांगलादेशातील मागास जिल्ह्यांतून येणार्‍या उमेदवारांना दहा टक्के कोटा देण्यात आला आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी असलेल्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना मात्र ३० टक्के कोटा या सरकारी नोकरीमध्ये देण्यात आला आहे. तसेच गुणवत्तेच्या जोरावर परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना एकूण जागांच्या ४४ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.

म्हणजेच, आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरीमध्ये ५६ टक्के जागा भरल्या जातात. त्याचवेळी गुणवत्ता असलेले विद्यार्थी मात्र ४४ टक्क्यांचे मानकरी होतात, त्यामुळेच बांगलादेशात असणारी ही आरक्षण पद्धत बदलण्याची मागणी आंदोलनकर्ते करत आहेत. मात्र, आंदोलनकर्त्यांमध्ये नसलेली एकवाक्यता संशयास्पद अशीच. काही आंदोलनकर्ते हे अल्पसंख्याक दिव्यांग, महिला आरक्षणाचे पुरस्कर्ते असून, स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांना असणारे सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करण्यासाठी ते प्रचंड आग्रही आहेत, तर काही आंदोलनकर्ते हे सरसकट आरक्षण रद्द करण्याची मागणी करताना दिसतात. काही आंदोलनकर्त्यांनी आरक्षण रद्द न करता, त्याचे टक्के कमी करण्याची मागणी केली आहे. या सर्वांतूनच आंदोलनकर्त्यांमध्ये एकवाक्यता नाही, हे स्पष्ट होते आहे.

सरकारच्यावतीने या आंदोलनकर्त्यांना ‘रझाकार’ संबोधून, त्यांना देशद्रोही ठरवण्यात आल्याची चर्चा सध्या बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एका पत्रकार परिषदेत आंदोलनकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकांविरोधात एवढा द्वेष का? आरक्षण हे स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांना द्यायचे नाही, तर रझाकारांना द्यायचे का? असे वक्तव्य केले. ‘रझाकार’ हा बांगलादेशमध्ये अपमान करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्दप्रयोग. १९७१च्या युद्धात पाकिस्तानला मदत करणारे हे ‘रझाकार’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांनी आता सरकारलाच विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चिघळलेल्या वातावरणात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते यांच्यातच जुंपली आणि सहा आंदोलनकर्त्यांचा हकनाक बळी गेला.

परिणामी, हे आंदोलन शमवण्यासाठी पोलिसांना अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या, लाठीचार्ज करावा लागला. बांगलादेशमध्ये १९७२ पासूनच माजी पंतप्रधान शेख मुज्जबीर रहेमान यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना ३० टक्के कोटा देण्याची तरतूद करून ठेवली होती. त्यामुळे अलीकडच्या काळात सरकारने यात काही बदल केला आहे असे नाही. मात्र, १९७२ पासून सुरू असलेल्या या पद्धतीवर अचानक देशव्यापी आंदोलन होते आणि त्यातून देशाची महत्त्वाची असलेली तरुण संपत्ती भडकावली जाते, हे चिन्ह फक्त आरक्षणाच्या आंदोलनाचे वाटत नाही. आज बांगलादेशात स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार आणि सध्याची सामान्य जनता यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न बांगलादेशात होतो आहे.

शेख हसीना देखील आंदोलनकर्त्यांना ‘रझाकार’ संबोधून एकप्रकारे आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. त्यातच बांगलादेशचा काही भाग वेगळा करुन स्वतंत्र ख्रिश्चन राष्ट्रनिर्मितीला मान्यता न दिल्यास राजकीय अनागोंदीला सामोरे जावे लागण्याबाबत हसीना यांनी गौप्यस्फोट केला होताच. त्यामुळे सध्या ज्यांनी बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या राष्ट्राला प्रेरणा देणार्‍यांविषयी बांगलादेशच्या भविष्याच्या मनात विष कालवण्याचे उद्योग कोण करीत आहे? त्यामुळे हे आंदोलन हा अज्ञातांनी हसीना यांना दिलेला इशारा तर नाही ना, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कौस्तुभ वीरकर 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121