मुंबई : प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता लवकरच भेटीला येणार आहे. यावेळी एक मोठा बदल असून महेश मांजरेकर नाही तर अभिनेता रितेश देशमुख सीझन होस्ट करताना दिसणार आहे. गेले अनेक दिवस बिग बॉस ५ चे प्रोमो प्रदर्शित केले जात आहेत. पण प्रेक्षक नेमका हा कार्यक्रम कधीपासून सुरु होणार याची वाट पाहात आहेत. आज त्यांची ही प्रतिक्षा संपणार असून सायंकाळी ५ वाजता ढोल ताशांच्या गजरात बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची तारीख जाहिर केली जाणार आहे.
"होणार ढोल ताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर! आज संध्याकाळी, जाहीर होणार बिग बॉस मराठीची ‘तारीख’. मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी” लवकरच...फक्त कलर्स मराठीवर" असं म्हणत नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या पोस्ट खाली अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
रितेश देशमुखने आजवर आपल्या अभिनयाने हिंदीसह मराठी प्रेक्षकांनाही 'वेड' लावलं आहे. पण आता छोटा पडदा व्यापून टाकायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे.