पावसाळ्यात सर्पदंशाचे (snake bite) प्रमाण वाढते. सर्पदंशाच्या भीतीनेच बहुतांश वेळा सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. गोरेगावच्या आऱे दुग्ध वसाहतीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शहरी भागातही सर्पदंशाचे (snake bite) प्रमाण अधिक आहे. असे असूनही त्यासाठी गरजेची असलेली अत्यावश्यक सेवा सहजरित्या उपलब्ध होत नाही. त्यानिमित्ताने या लेखातून सद्यःपरिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
केदार भिडे - शहरी जैवविविधतेत सर्प हा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी राहणीमान व निसर्गाची आवड असल्यामुळे तयार केलेल्या बागा वा त्याचे प्रकार, मानवी अन्नस्रोत आणि त्यामुळे वाढणारे उंदीर आणि इतर प्राण्यांमुळे काही सर्पांच्या जातींचा आपल्या आजूबाजूला कायम वावर आणि आढळ असतो. या परिस्थितीत सर्पदंशासारख्या घटना कमी व्हाव्या आणि झाल्याच, तर त्यासाठी आपली आरोग्य संस्था तत्पर आणि प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. आज एखाद्या वाघाचा किंवा बिबट्याचा हल्ला झाला, तर वनविभाग तत्परतेने कार्यवाही करते. मात्र, तोच विभाग सर्पदंशाने (snake bite) झालेला मृत्यू हा आपली जबाबदारी मानत नाही. खरे तर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत परिशिष्टामध्ये सर्पांना वाघ आणि बिबट्याच्या बरोबरीचे स्थान दिले गेले आहे. (snake bite)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्च, 2024 मध्ये ’नॅशनल अॅक्शन प्लॅन ऑन स्नेक बाईट इनवेनमिंग’ प्रसिद्ध केला. या कार्य योजनेप्रमाणे प्रत्येक राज्याने ’स्टेट अॅक्शन प्लॅन ऑन स्नेक बाईट इनवेनमिंग’ तयार करावा, असे अपेक्षित आहे. सर्पदंश ’नॉटिफिएबल डिसीज‘ जाहीर करावा, आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना प्रशिक्षण द्यावे, प्रति सर्पविषाची उपलब्धता वाढवावी आणि सर्पदंशाने दगावलेल्या रुग्णांना भरपाई मिळावी, अशा प्रकारचे अनेक विषय या कार्ययोजनेत सुचवलेले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, राज्यस्तरावर सर्पदंश नोडल अधिकारी नियुक्त करण्याची शिफारस. या अधिकार्यांची जबाबदारी म्हणजे आरोग्य विभाग, वन विभाग, पशुपालन विभाग आणि शेतीविभाग यांच्यामध्ये सर्प आणि सर्पदंशाबाबतच्या कोणत्याही कामाविषयी समन्वय साधून देणे.
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू हा एक विषय फक्त आरोग्य विभाग सोडवू शकणार नाही. त्यामध्ये वन विभागाला खूप मोठी जबाबदारी आणि भूमिका घ्यावी लागणार आहे. सर्प हे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असल्यामुळे सर्पबचाव, विषसंग्रहण, प्रतिसर्पविष उत्पादन, सर्प व सर्पविष संशोधन आणि जीवितहानी भरपाई या बाबी वन विभागाच्या अखत्यारीत येतात. तसेच अनेक सर्पदंश हे शेतीविषयक कार्य करताना होतात म्हणून शेतकी आणि पशुसंवर्धन विभागालादेखील यामध्ये जोडणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत आदिवासी वसतिगृहातदेखील अनेक सर्पदंशांच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी कल्याण विभाग आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण खातेदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ज्यामुळे सर्पतथ्य आणि सर्पदंश टाळण्यासाठी लागणार्या ज्ञानाचा प्रसार जनतेमध्ये होईल.
सगळ्यात महत्त्वाची भूमिका मात्र आरोग्य खात्याचीच राहील. सर्पदंश, विषबाधा आणि उपचार यांचे प्रशिक्षण हे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सर्व आरोग्य कर्मचार्यांना देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रति सर्पविषाची उपलब्धता वाढवणे आणि त्याचा योग्य संचय आणि वापर करणे, यासाठी एक कार्यप्रणाली निर्माण करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. सर्पदंश आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांची संख्या आपल्या देशात जवळजवळ प्रतिवर्षी 60 हजारांच्या आसपास आहे. गेल्याच महिन्यात कर्नाटक राज्याने सर्पदंश हा ’नॉटिफ़िएबल डिसीज़’ म्हणून जाहीर केला आहे. तसेच जिल्हा पातळीवर सर्पदंश प्रशिक्षिण सुद्धा कार्यान्वित केले आहे.
महाराष्ट्राला सर्प संवर्धन आणि प्रतिसर्पविष उत्पादन याचा मोठा वारसा मिळाला आहे. सगळ्यात जास्त सर्पमित्र हे आपल्या राज्यात आहेत. सर्पदंश मृत्यू कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रतिसर्पविष उत्पादन सगळ्यात जास्त आपल्याच राज्यात होते. भारतातले सगळ्यात पहिले प्रतिसर्पविषही 1945 साली परळच्या हाफकिन संस्थेत तयार झाले होते. महाराष्ट्र राज्य वनसंवर्धन आणि आरोग्यसंवर्धन दोन्हीमध्ये अग्रेसर आहे, ते मात्र सर्पसंवर्धन आणि सर्पदंश मृत्यू कमी करण्यासाठी आज मागे पडत चालले आहे. फक्त सरकारी पातळीवर नाही, तर आज राज्यात अग्रणी असलेल्या वनसंवर्धन आणि संशोधन संस्था आणि निसर्गप्रेमी यांनीही हा विषय दुर्लक्षित केला आहे, हीच खरी शोकांतिका आहे.
सर्पदंशावरील प्रथमोपचार
- सापाला मारायचा किंवा पकडायचा प्रयत्न न करता त्यापासून दूर व्हावे.
- जर स्वतःला दंश झाला असेल, तर सापापासून दूर होऊन न घाबरता मदतीसाठी हाक मारावी.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीस धीर द्यावा. बरेच सर्प हे बिनविषारी असतात आणि जरी विषारी साप चावला, तरी तो बर्याचवेळा आपले विष व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडत नाही. त्यामुळे विषबाधेची शक्यता खूप कमी असते. अशावेळेस त्याला धीर देऊन विषावर उपचार उपलब्ध असल्याचा विश्वास द्यावा.
- दंश झालेल्या ठिकाणी आवळपट्टी किंवा दोरी बांधू नये.
- दंश झालेल्या जागेवर कापण्याचा, पाण्याने धुण्याचा अथवा तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करू नये.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीस तोंडाने काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये.
- वेळ वाया न घालवता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जावे.
- सर्पदंशाने झालेल्या विषबाधेवर, प्रतिसर्पविष (अँटी व्हेनम) हा एकच उपाय आहे.
(लेखक सर्प अभ्यासक असून ते सर्पदंशावर जनजागृती करतात.)