युवकांच्या पंखांना अधिक बळ देणारा अर्थसंकल्प : मंत्री मंगल प्रभात लोढा
28-Jun-2024
Total Views | 38
मुंबई : युवकांच्या पंखांना अधिक बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या आपल्या प्रयत्नांना पाठबळ दिल्याबाबद्दल मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व इतर सर्वच घटकांचा संवेदनशीलपणे विचार करून अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने बनवला गेला आहे. आज आपल्या देशाला कौशल्य संपन्न युवाशक्तीची महासत्ता म्हणून बघितले जाते आणि त्यात महाराष्ट्राचे अनन्यसाधारण योगदान अधोरेखित करणारा आजचा हा अर्थसंकल्प आहे. आजच्या अर्थसंकल्पात रोजगार मेळावे, कौशल्य विकास केंद्रांची स्थापना, जागतिक कौशल्य केंद्र विकसित करणे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा विकास, डेटा सेंटरची निर्मिती, रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी केल्या गेलेल्या घोषणा युवकांच्या पंखांना अधिक बळ देणाऱ्या आहेत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, " मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, पिंक ई-रिक्षा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना यासारख्या विविध योजना, महिलांना अधिक सशक्त करण्यास मदत करतील. शेतकऱ्यांना पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेसारख्या योजनांचा समावेश देखील आजच्या अर्थसंकल्पात होता. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाचा रथ अधिक जलदगतीने धावेल याची आम्हाला खात्री आहे," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कौशल्य संपन्न महाराष्ट्र घडवण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या घोषणा खालीलप्रमाणे:
१. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना- दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा १० हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन, दरवर्षी सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्च.
२. महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’.
३. जागतिक बॅंक सहाय्यित २३०७ कोटी रुपये किमतीचा ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास’.
4. ५०० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ.
५. मॉडेल आय.टी.आय, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण.
६. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता.
७. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन २०२३-२४ मध्ये ९५,४७८ उमेदवारांची नोकरीसाठी निवड.
८. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित. ग्रामीण भागात ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन, १५ ते ४५ वयोगटातील १८,९८० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण.