मुंबई : मुंबई महानगपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत दि. २४ जून रोजी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अभिनेते अक्षय कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिवसभरात १८० झाडे लावण्यात आली. या मोहिमेत बहावाची ३०० झाडे लावण्यात येणार आहेत.
मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम राबवित असते. या उपक्रम अंतर्गत हे वृक्षारोपण पार पडले. अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यांचे दिवंगत वडील हरी ओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या झाडांचे रोपण केले.यावेळी उप आयुक्त (परिमंडळ ३) (अतिरिक्त कार्यभार) विश्वास मोटे, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, मेगा फाउंडेशनच्या डॉ. अनुषा श्रीनिवासन अय्यर आदींसह महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ही वृक्षारोपण मोहीम मुंबईला हरित ठेवण्यासाठी राबविण्यात येत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यातून झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी ‘झाडांचा खड्डा स्वीकारा आणि निसर्गाचे पालक बना’ या मोहिमेत आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बप्पी लाहिरी, अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण, सोनू निगम, संग्राम सिंह, रणवीर शौरी आणि त्यांचा मुलगा हारून शौरी, रोहित शेट्टी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, आयेशा झुल्का आदींनी सहभाग नोंदविला आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गालगत दोन झाडांच्या मध्यभागी किंवा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल. अशा जागेवर पालिकेकडून पावसाळ्यात बहावाच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. ज्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेला दिसेल.
- जितेंद्र परदेशी (उद्यान अधीक्षक)