‘सामना’चं नाव बदलून...; चित्राताईंचा राऊतांना खोचक टोला
20-Jun-2024
Total Views | 294
मुंबई : सामनाचं नाव बदलून टोमणा ठेवा, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत राऊतांवर जोरदार निशाणा साधला.
चित्रा वाघ आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, "ब्रँड आणि ब्रँडीसारखे पाचकळ विनोद करून सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही पेपरवाले नाही तर पडेल कॉमेडी शो चे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय. त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा. पण त्या टोमण्यांमध्ये किमान धार तरी ठेवा. की पहिल्या धारेचा एवढाच असर होतो? इतक्याशा विजयाची इतकी हवा डोक्यात जाऊ देऊ नका, नाही तर लवकरच‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी अवस्था होईल," असा घणाघात त्यांनी केला आहे.