मुंबई : बहुचर्चित मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी माघार घेतल्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार किरण रवींद्र शेलार विरुद्ध उबाठा गटाचे अनिल परब असा सामना रंगणार आहे. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा बुधवार, दि. १२ जून रोजी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी मुंबई पदवीधरमधून दोनजणांनी माघार घेतली. या मतदारसंघात एकूण आठजण आखाड्यात असले, तरी मुख्य लढत ही किरण शेलार आणि अनिल परब यांच्यात होणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेपाठोपाठ शिवसेनेच्या संजय मोरे यांनीही माघार घेतली आहे. तर, उबाठा गटाच्या किशोर जैन आणि शरद पवार गटाच्या अमित सरैय्या यांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या मतदारसंघात एकूण १२ उमेदवार मैदानात आहेत.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची मुभा
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाकरिता मतदानाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सुधारित वेळेनुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानप्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात यंदा १ लाख, १६ हजार, ९२३ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यांपैकी मुंबई शहर ३१ हजार, २२९, तर मुबंई उपनगरातील पदवीधर मतदारांची संख्या ८५ हजार, ६९४ इतकी आहे.
मुंबई शिक्षकमध्ये चौरंगी लढत
मुंबई शिक्षक मतदारसंघात मात्र मुख्य राजकीय पक्षांतील एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने चौरंगी लढत होणार आहे. भाजपच्या पाठिंबा मिळवलेले शिवनाथ दराडे, उबाठा गटाकडून ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नाशिकमध्ये तिरंगी लढत
नाशिक शिक्षक मतदारसंघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विनंती केल्यानंतर प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. याचदरम्यान, काँग्रेसच्यावतीने अर्ज दाखल करणारे दिलीप पाटील आणि भाजप इच्छुक धनराज विसपुते यांनीही माघार घेतल्याने आता शिवसेनेचे किशोर दराडे, उबाठा गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे असा तिरंगी सामना रंगणार आहे.