मुंबई : काँग्रेस नेते राहूल गांधी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण हिरावून घेतील असा आरोप केला होता. याबद्दल त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे.
रामदास आठलले म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असून गरिबांसाठी १० टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. मागील १० वर्षात मोदींनी आणि अमित शहांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, संविधानाने दिलेले आरक्षण कधीही बदलणार नाही. आरक्षणाला कधीही धक्का लागणार नाही."
"काँग्रेसच्या राहुल गांधींनी तेलंगणामध्ये मोदी आरक्षण हिरावून घेतील असा खोटा आरोप केला आहे. समाजाची दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधीच्या या खोटारडेपणाचा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत. राहुल गांधी यांनी केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे आपण तक्रार करणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आरक्षण हटविणारे नाहीत उलट आरक्षणाला संरक्षण देणारे नेते आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणूक आयेगाकडे तक्रार करणार आहोत," असे ते म्हणाले.