"आव्हाड अशा चुकांना माफी नसते!" कारवाई होणारच, मंत्र्यांचं सूचक वक्तव्यं
29-May-2024
Total Views | 1375
मुंबई : जितेंद्र आव्हाडांना अशी चूक करताच येणार नाही आणि चूका करुन माफी मागितली तर माफही करता येणार नाही, असं वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबडकरांचा फोटो जाळल्याचे अमोल मिटकरींनी म्हटले आहे. यावरून आता सध्या राजकारण तापलं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याला विरोध केला आहे. त्यांनी बुधवारी महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे.
यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही. उद्या अशा चूका करुन कुणी माफी मागतली तर त्यांना माफही करता येणार नाही. कायद्याच्या अपेक्षित चौकटीत कारवाई होणं ही जबाबदारी सरकारवर आहे," असे ते म्हणाले. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.