अनिल परबांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

    29-Jul-2025
Total Views |


मुंबई : उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्स बार आणि वाळू चोरी प्रकरणी गंभीर आरोप केले होते. याच अनुषंगाने मंगळवार, २९ जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर योगेश कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, "विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून अनिल परब यांनी माझ्यावर जे काही आरोप केले त्यावर मी माझी बाजू मांडलेली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली. तसेच काही दिवसांनी ते राष्ट्रपती महोदयांकडेसुद्धा जातील. राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे ज्या खात्यांची जबाबदारी आहे त्या माझ्या कामांकडे माझे पूर्ण लक्ष आहे. ते काय करतात आणि ते कुणाला जाऊन भेटतात याकडे माझे लक्ष नाही. माझ्यावर असलेली जबाबदारी मी पार पाडत राहीन. त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे जी कागदपत्रे दिली त्यातून माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे माझी बाजून मांडेन."

"आम्ही अनेक वर्षे ती वास्तू भाड्याने दिली असून कायद्यानुसार, तो भाडेकरूच जबाबदार आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देऊ. अनिल परब कुणालाही भेटले तरी माझे लक्ष माझ्या कामावर असेल. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. माझे लक्ष महाराष्ट्राच्या विकासाकडे आहे," असे त्यांनी स्पष्ट केली.

मराठी भाषेसंबंधी मनसेकडून होत असलेल्या मारहाणीवर बोलताना ते म्हणाले की, "फक्त राजकारण करण्यासाठी होत असलेली मारहाण सहन केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणी मराठीचा अपमान करत असल्यास आपण संबंधित पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी. आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करू. त्यासाठी कायदा हातात घेण्याची गरज नाही. काही लोकांना फक्त राजकीय पोटशून उठल्याने मराठी मतदारांना आम्हीच मराठीचे मसीहा आहोत, हे भासवण्यासाठी मारहाण सुरु असून ती चालणार नाही," असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.