मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असणारा धडक चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग निर्माता करण जोहर घेऊन येत आहे. धडक २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर झाली असून यात दोन मोठे बदल दिसणार आहे. एक म्हणजे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अॅनिमल चित्रपट फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी झळकणार आहेत. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार असून धडक चे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले होते.
धडक २ चित्रपटाचे पोस्टर आणि व्हिडिओ शेअर करत एक राजा, एक रानी, एक कहानी - २ धडकने! असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर, व्हिडिओमध्ये एक था राजा, एक थी राणी, जात अलग थी, खतम कहानी अशा ओळी झळकत आहेत.
त्यामुळे धडक चित्रपटाप्रमाणेच धडक २ चे कथानक देखील जातीवादात अडकलेल्या प्रेमावर भाष्य करणारे असणार हे दिसून येत आहे.
जी स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन आणि क्लाउड 9 पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्मिती होत असलेला ‘धडक २’ चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. मुळात 'धडक' हा चित्रपट मराठी भाषेतील सुपरहिट चित्रपट ‘सैराट’ चा हिंदी रिमेक होता. 'सैराट'ने मराठी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे कमाई केली होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु ही जोडी चित्रपटसृष्टीला मिळाली होती.