मुंबई : लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा' शो मध्ये काम मिळवून देतो असं खोटं सांगून एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून तुळींज पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मनोरंजनसृष्टी हादरली आहे. सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर द कपिल शर्मा शो सुरु असून यात अनेक हिंदीतील कलाकार येत असतात.
या घटनेतील आरोपीचे नाव आनंद सिंग असे असून तो नालासोपारा येथे राहतो. २६ वर्षीय पीडित महिलेला त्याने आपली चित्रपटसृष्टीत खूप ओळख असून, कपिल शर्मा शोमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दाखवून २० मे रोजी तिला घरी बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केला होता. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच या प्रकारबाबत कुठे काही बोलल्यास तिला जीवे मारण्याचीही धमकी त्याने दिली होती. मात्र, पीडित महिलेने याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात पीडीतेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी आनंद सिंग यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात भादविस कलम 376, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान, कपिल शर्माच्या शोबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी ४ हजार ९९९ रुपये देऊन तिकीट खरेदी करता येईल, अशी एक जाहिरात काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाली होती. पण याबाबत स्वत: कपिल शर्मा याने शोमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा काम करण्यासाठी कपिल शर्माच्या टीमकडून कधीही पैसे आकारण्यात येत नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते.