पुणे अपघाताची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल! कठोर कारवाईचे आदेश
21-May-2024
Total Views | 87
पुणे : पुण्यात शनिवारी मध्यरात्री एक धक्कादायक अपघात घडला. एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.
वेदांत अग्रवाल असे आरोपीचे नाव असून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा आहे. वेदांत अग्रवाल मद्यप्राशन करून भरधाव वेगात पोर्श कार चालवत होता. दरम्यान, त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनिस अवलिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातापूर्वी आरोपी एका पबमधून बाहेर पडला होता. पबमध्ये मद्यप्राशन करतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अपघातानंतर स्थानिक लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली. परंतू, अल्पवयीन असल्याने अवघ्या काही तासांतच त्याची सुटका करण्यात आली.
दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेची दखल घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याच्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत.
तसेच पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीला विशेष वागणूक दिली असल्यास पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि हे खरं असल्यास संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबव करण्याच्या सूचनाही फडणवीसांनी दिल्या आहेत.