मुंबई, दि.२१: प्रतिनिधी मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना सोमवार, दि. २० मे, रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिटदरावर) १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाने घेतला होता. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ तब्बल ७६,५९६ प्रवाशांनी घेतल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली.
मुंबई मध्ये लोकसभा निवडणूक - २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, २०२४ रोजी पार पडले. लोकशाहीच्या या उत्साहात मतदार म्हणून मतदान करण्याकरीता लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. त्याचा हजारो प्रवाशांनी लाभ घेतला.