पराभवाची चाहूल...

    20-May-2024
Total Views | 344
Priyanka Gandhi

पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असून, काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीलाही पराभवाची पुरती चाहूल लागलेली दिसते. तरीही निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांत जादूची कांडी फिरेल, या आशेने प्रियंका आणि राहुल गांधींनी जाती-धर्माच्या मुद्द्यावरुन मतदारांमध्ये संभ्रमनिर्मितीचे प्रयत्न सुरुच ठेवलेले दिसतात. पण, मतदार या षड्यंत्राला कदापि भुलणार नाही, हे निश्चित!
 
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, पंतप्रधान मोदी हे धर्माचे राजकारण करतात, असा गंभीर आरोप केला. किंबहुना, पंतप्रधान मोदी यांच्या ‘मी कधीही हिंदू किंवा मुस्लीम म्हटलेले नाही,’ या दाव्यानंतर प्रियंका यांनी हा आरोप केला आहे. भाजपने धर्माचे राजकारण केले, असेही त्यांनी रायबरेली येथे बोलताना म्हटले. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या विधानाला खरेतर फारशा गांभीर्याने घेण्याची कधीही गरज नसते. मात्र, निवडणूक प्रचाराच्या काळात विशेषतः गांधी परिवार काय म्हणतो, याकडे सगळ्यांचेच असते. त्याला हेतुतः प्रसिद्धी दिली जाते, त्यासाठीच हा दावा कसा हास्यास्पद आहे, हे पाहायला पाहिजे. २०१४ पर्यंत देशात तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेसने केले, हे नव्याने सांगायला नको. २०१४ पूर्वीपर्यंत देशात हिंदू म्हणून स्वतःची ओळख सांगणे, हा मोठा अपराध होता. ज्या काही सवलती दिल्या जात होत्या, त्या मुस्लिमांनाच. म्हणूनच, अयोध्येत श्रीराम जन्मस्थळी मंदिर उभारण्याचा संकल्प जेव्हा भाजपने सोडला, तेव्हा त्याची चेष्टा केली गेली.
 
१९८०च्या दशकापासून २०२४ मधील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण प्रवास भाजपच्या ‘संकल्प से सिद्धीतक’ याला अधोरेखित करणारा आहे. एखादा संकल्प सोडला की, तो कसा पूर्ण करावा, याचा आदर्श परिपाठ भाजपने आखून दिला. म्हणूनच, भाजपचा जाहीरनामा नसतो, तर संकल्पपत्र असतेे. आज लाखो भाविक देश-विदेशांतून अयोध्येत दररोज भेट देत आहेत, ते त्यांची श्रीरामाबद्दल असीम आस्था आहे, म्हणूनच. २२ जानेवारी रोजी जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, तेव्हा त्याचे संपूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त भाजपचेच होते. यात निर्विवादपणे अन्य कोणताही पक्ष आपला हक्क सांगू शकत नव्हता. अगदी उद्धव ठाकरेंनीसुद्धा ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे’ अशा शब्दांत भाजपची खिल्ली उडवली होती. म्हणूनच, देशातील काँग्रेससह २८ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला. भाजप श्रीराम मंदिराचे राजकारण करत आहे, असा आरोप करत त्यांनी तेथे येण्याचे नाकारले. पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी म्हणून ११ दिवसांचे अनुष्ठान केले. श्रीरामासंबंधी सर्व देवस्थानांना भेटी दिल्या. इतकी आस्था, श्रद्धा अन्य कोणत्याही नेत्याकडे अभावानेच दिसेल.
 
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हा श्रीरामाशी संबंधित होता. जगभरातून तो पाहिला गेला. ५०० वर्षांच्या वनवासानंतर, रामलला आपल्या जन्मस्थानी परतले, हा हृद्य क्षण प्रत्येकाने आपल्या मनात साठवून ठेवला. याचे श्रेय भाजपला मिळणार होते, हे मान्य केले तरी एक हिंदू म्हणून देशातील सर्वच विरोधी पक्ष याला उपस्थित राहू शकले असते. रमझानच्या काळात, डोक्यावर जाळीदार टोपी घालून, इफ्तार पार्टीचे आयोजन करणार्‍या पुरोगामी नेत्यांना अयोध्येत यावे वाटले नाही, हाच त्यांचा ढोंगी निधर्मीपणा होता. भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांचा अनुनय करण्याची जी चुकीची प्रथा रूढ झाली आहे, त्याचेच हे जीवंत उदाहरण होते. प्रत्यक्षात निधर्मी ही संकल्पनाही काँग्रेसनेच घटनेत बदल करत घुसवलेली आहे. आम्ही धर्म, जात मानत नाही, असे प्रियंका अगदी ठासून सांगतात. मग हिंदूंचा त्या द्वेष का करतात, हेही त्यांनी स्पष्ट करावे. जात मानत नाहीत म्हणता, मग काँग्रेस देशभरात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी का करत आहे, हेही त्यांनी सांगावे.
 
मुस्लिमांचे लांगूलचालन हाच प्रत्यक्षात काँग्रेसचा एककलमी कार्यक्रम आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याचे लख्ख प्रतिबिंब उमटलेले दिसते. संपत्तीचे पुनर्वाटप करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी राजस्थान येथे बोलताना, कठोर शब्दांत प्रहार करत काँग्रेसी मनसुबे उघडे पाडले. राहुल यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी तर अमेरिकेत नसलेला वारसा करार भारतात लागू करण्यात यावा, असा सल्ला दिला होता. वारसांना केवळ ४५ टक्के तर सरकारकडे ५५ टक्के इतका संपत्तीचा भाग जमा करण्याची, अमेरिकेतही नसलेली तरतूद त्यांनी सुचवली होती. देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, हे काँग्रेसी मनमोहनसिंह यांनीच म्हटले होते, हे प्रियंका यांना स्मरतही नसेल. देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झालेली असल्यानेच, संविधान समितीने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास स्पष्टपणे विरोध केला असतानाही, काँग्रेसने कर्नाटकात ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना आरक्षण देण्याची चुकीची प्रथा आखली. त्याबद्दलही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी. देशातील १४० कोटी जनता भारतीय म्हणून पुढे जात असताना, त्यांना पुन्हा जातीपातीत विभागण्याचे पाप काँग्रेस करत आहे. दक्षिण भारतीय विरोधात उत्तर भारतीय अशी रेषा काँग्रेसने यापूर्वीच आखली आहे.
 
युवराज राहुल तर माओवाद्यांचीच भाषा वापरतात. त्यांचा उद्योजकांवर विशेषतः अंबानी आणि अदानी यांच्यावर विशेष राग आहे. राहुल यांचे जे धोरण आहे ते उद्योगविरोधी आणि उद्योजकविरोधी असेच. त्यामुळेच काँग्रेसी राज्यांमध्ये कोणताही उद्योजक गुंतवणूक करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल, अशी परिस्थिती आहे. असेही राहुल आणि चिनी साम्यवादी धोरणे यांच्यात कमालीचे साम्य आहे. त्याचेच प्रतिबिंब काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उमटले आहे. साम्यवादाशी जवळीक साधण्याची राहुल यांची मानसिकता, देशाला अधोगतीच्या मार्गाकडे नेणारी ठरेल. केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा कणा मोडला आहे, तर राहुल त्यांना बळ देण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांना निधी देण्याची जबाबदारी काँग्रेसने घेतली आहे. म्हणूनच, ही देशहितासाठी अत्यंत मारक अशी गोष्ट ठरते.
 
एकूणातच, काँग्रेसने मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचे जे धोरण राबवले, त्यादृष्टीने काँग्रेसी जाहीरनाम्यात ज्या तरतुदी केल्या, जी आश्वासने दिली आहेत, ती तुष्टीकरणाचे राजकारण कसे केले जाते, त्याचे उदाहरण ठरावे. आजवर काँग्रेसने आपल्या कार्यकाळात हेच तर केले. समाजाचा विकास न करता, त्यांना सवलतीच्या कुबड्या दिल्या. त्याचवेळी पंतप्रधान मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ वर ठाम आहेत. त्याला ‘सबका प्रयास’ची त्यांनी दिलेली जोड काँग्रेसला अस्वस्थ करणारी आहे. आपल्या परंपरागत हक्काच्या मतपेढ्या हातातून जात असल्यानेच, त्यांनी पुन्हा एकदा फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली आहे. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. आता दोन टप्पे बाकी आहेत. संपूर्ण प्रचारात काँग्रेसने अवलंबलेले हे धोरण काँग्रेसच्या पदरात काय देणार आहे, याचे उत्तर ४ जून रोजी मिळालेले असेल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121