बाळासाहेब किंगमेकर होते! पण उबाठाला सत्तेची हाव सुटली अन् पक्ष गेला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
29-Apr-2024
Total Views | 64
सांगली : बाळासाहेब नेहमी म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली आणि पक्ष गेला, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. सांगलीतील धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब नेहमी म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली. हातचे सगळे घालवले, सोन्यासारखी माणसे गेली, पक्ष गेला. मात्र आपण सत्ता, खुर्चीसाठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर तडजोड करणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
“आपण स्वतःही धरणग्रस्त कुटूंबातील असून कोयना धरण उभारणीत आमचीही जमीन गेल्याने धरणग्रस्तांच्या वेदना मला ठाऊक आहेत. कोयना धरणग्रस्तांप्रमाणेच येथील धरणग्रस्तांना न्याय देऊ. नागनाथ अण्णा नाईकवाडी धरणग्रस्त महामंडळाबाबत आणि त्यांच्या स्मारकासाठी निधी दिला जाईल,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जन्म राष्ट्रनितीसाठी झाला असून जगभरात भारताचे नाव मोदीजींनी रोशन केले आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जन्म कट कमिशन आणि भ्रष्टाराचाराठी झाला असून त्यांच्याकडे अजेंडा नाही, नियत नाही आणि नेतासुद्धा नाही. मोदीजींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. संविधान बदलणार असा खोटा प्रचार आणि संभ्रम पसरवण्याचे काम विरोधांकडून केलं जातं आहे, कारण त्यांना पराभव दिसत आहे,” असेही ते म्हणाले.