संदेशखळीमध्ये सीबीआयची छापेमारी; 'हाफिझुल खान'च्या घरातून शस्त्रसाठा जप्त

    26-Apr-2024
Total Views |
CBI Sandeshkhali Raid
 
कोलकाता : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे छापा टाकला. सीबीआयने संदेशखळी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सीबीआय जानेवारी २०२४ मध्ये संदेशखळी येथे ईडी टीमवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहे.
 
सीबीआयने संदेशखळी येथील शाहजहान शेखच्या जवळच्या सहकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असून तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परदेशात बनवलेली शस्त्रेही येथून जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय सुरक्षा दलासह सीबीआयचे पथक येथे पोहोचले आहे.
 
 
वृत्तानुसार, सीबीआयचे पथक संदेशखळीच्या सर्बिया भागात छापा टाकण्यासाठी पोहोचले आहे जिथे त्यांनी शाहजहानचा जवळचा सहकारी हाफिझुल खानच्या घरातून ही शस्त्रे जप्त केली आहेत. हफीझुल हा तृणमूल काँग्रेसचा नेता असल्याचेही सांगण्यात येत आहे. संदेशखळी येथे दि. ५ जानेवारी २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सीबीआय हा छापा टाकण्यासाठी पोहोचली आहे.
 
 
सीबीआयचा हा छापा सकाळपासून सुरू आहे. या प्रकरणी बंगाल सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उल्लेखनीय आहे की, दि. ५ जानेवारी २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चे एक पथक संदेशखळी येथे चौकशीसाठी गेले होते. हे पथक रेशन घोटाळाप्रकरणी शेख शहाजहानची चौकशी करण्यासाठी आले होते. यावेळी ईडी आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकावर शाहजहानच्या गुंडांनी हल्ला केला होता. त्यांच्या वाहनांची तोडफोड करून अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती.
 
 
या हल्ल्यात तीन अधिकारी जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर संदेशखळीचे भीषण सत्य देशासमोर येऊ लागले. टीएमसी नेता आणि स्थानिक गुंड शेख शाहजहान आणि त्याच्या सहकाऱ्यांवर महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याशिवाय लोकांच्या जमिनी बळकावणे, मारहाण करणे, धमकावणे असे आरोपही त्याच्यावर आहेत. शेख शहाजहान आधी फरार झाला होता पण नंतर पकडला गेला. सध्या तो केंद्रीय यंत्रणांच्या ताब्यात आहे.