"३५ वर्षे आमदारकी, २० वर्षे..."; गिरीश महाजनांची खडसेंवर नाव न घेता टीका
17-Apr-2024
Total Views | 129
जळगाव : ज्यांनी पक्षात ३०,३५ वर्ष आमदारकी भोगली आणि २० वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले ते आता दुसऱ्या पक्षात जाऊन पडले, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव न घेता केली आहे. ते जळगावमध्ये आयोजित महायूतीच्या मेळाव्यात बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "ज्यांचं पुण्य संपलं तो आमच्या पक्षातून बाहेर गेला असावा. तुम्ही एकदा बाहेर गेलात आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे. या पक्षात ज्यांनी ३०,३५ वर्ष आमदारकी भोगली आणि २० वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले आणि हे पक्षामुळे नाही तर माझ्यामुळे आहे, अशा आविर्भावात असणारे नेते आज कुठे जाऊन पडलेत," असे ते म्हणाले.
"३०-३५ वर्षे ते पक्षात होते आणि एकदा पक्षात पडले तर लगेच दुसऱ्या दिवशी पक्ष बदलला. म्हणजे ३५ वर्षांचं सगळं वाया गेलं. तुमची पक्षावर काहीच निष्ठा नाही. माझ्यावर अन्याय झाला असं ते म्हणतात. पण हा पक्ष आहे म्हणून आपण आहोत, असं मला वाटतं. आज तुम्ही मतदारसंघात कितीही काम करा पण पक्ष महत्वाचा असतो. त्यामुळे निष्ठा खूप महत्वाची असते," असेही ते म्हणाले.
दरम्यान, एकनाथ खडसे हे लवकरच घरवापसी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्वत: याबाबतचा खुलासा करत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे ते आता कधी प्रवेश करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.