स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची सुरुवात!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
06-Mar-2024
Total Views | 109
मुंबई : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तरूणांना परदेशातील रोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास प्रबोधिनीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने विद्याविहार येथे प्रथमच सुरु झालेल्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढादेखील उपस्थित होते.
या प्रबोधिनीच्या माध्यमातून जपान, जर्मनी, इस्राईल आणि फ्रांस या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारचा जर्मनीसोबत करार झाला असून त्याद्वारे ५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. अशा मागण्या लक्षात घेऊन, बाहेर देशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषा कौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनीमध्ये जपानी, हिब्रू, जर्मन आणि फ्रेंच या ४ भाषांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यासोबतच परदेशात जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा इच्छुकांना मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे. बदलत्या डिजिटल युगाच्या गरजांसाठी आणि स्वयं-रोजगारासाठी या प्रबोधिनीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या सारख्या नाविन्यपूर्ण विषयाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था तसेच स्टार्टप्ससाठी इनक्यूबेशन सेंटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.