मनसे-भाजप युतीचं 'राज' दोन दिवसांत स्पष्ट होणार! फडणवीसांचं सूचक वक्तव्य
20-Mar-2024
Total Views | 104
मुंबई : राज ठाकरे आणि अमित शाहांच्या भेटीबाबत एक दोन दिवसांत सगळं चित्र स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. राज्याच्या राजकारणात सध्या मनसे महायूतीत जाण्याबाबतच्या चर्चा सुरु असताना आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज ठाकरेंची अमित शाहांसोबत भेट झालेली आहे. मला असं वाटतं की, आता यावर प्री-मॅच्युअर बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट पाहा. म्हणजे तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी सविस्तर सांगू," असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मनसेबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे महायूतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, असे झाल्यास मनसे किती जागा लढवणार, याबद्दलची उत्सुकता लागली आहे.
याबद्दल बोलताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीत लोकसभेच्या जागांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही येत्या एक दोन दिवसांत मनसे आणि महायुतीबाबत सगळी माहिती समोर येणार असल्याचे म्हटले आहे.