‘प्रवास करेल तो सायकलनेच’ हे ध्येय उराशी बाळगणार्या, ममता परदेशी यांनी गड-किल्ल्यांसह हिमालयातील शिखरांची भ्रमंती केली आहे. सर्वत्र सायकलने प्रवास करणार्या, ममता यांच्या प्रवासाविषयी...
ममता या डोंबिवली पूर्वेतील चार रस्ता परिसरात राहतात. ममता या निसर्गप्रेमी असून, त्यांची गिर्यारोहणाची आणि सायकलिंगची आवड त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. ममता यांचा डोंबिवलीतील राजाजी पथ येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. ममता या लग्न होऊन २००० साली डोंबिवलीत आल्या. त्यांचे पती प्रदीप परदेशी हे नोकरी करतात. लग्नानंतर त्यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांचे पती प्रदीप यांनी त्यांना पाठिंबा दिला. ममता या २०१६ साली सायकलिंगकडे वळल्या. ममता यांनी लहानपणी सायकल चालविली होती. त्या नंतरच्या काळात सायकल चालवण्यात खंड पडला. पण त्यांच्या पतीने त्यांना सायकल चालविणे शिकविले. त्यांचा फायदा त्यांना गिर्यारोहणाला गेल्यावर होऊ लागला. ममता या ब्युटी पार्लर किंवा इतर कुठे ही जायचे असेल तर सायकलवरूनच जातात. गेल्या आठ वर्षांपासून त्यांचा हा प्रदूषण विरहित प्रवास सुरू आहे.
सायकलिंगची आवड असल्याने मुंबई-गोवा, कोल्हापूर अशी दूरवरची ठिकाणेदेखील विशिष्ट कालवधीत गाठण्याची किमया त्यांनी साधली आहे. सायकलिंग करून गड-किल्ल्यांचे गिर्यारोहण करून, परत माघारी फिरणे यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. हा फिटनेस कायम राखत, ममता गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीची आवड जोपासत आहेत. गेल्या सहा वर्षांत सायकलिंग आणि गिर्यारोहणाच्या माध्यमातून त्यांनी टिंगलवाडी, कळसुबाई, कलावंतीण, पेठ, आजोबा, तावली, श्रीमलंगगड, पेब, माथेरान, कोंढाणा, हरिश्चंद्रगड, राजमाची, भीमाशंकर, ब्रह्मगिरी, रायगड, मुंब्रा, सरसगड, कर्नाळा अशा महाराष्ट्रातील किल्ल्यांसह हिमालयातील उंच शिखरांची देखील भ्रमंती केली आहे. इतक्या कमी कालवधीत तब्बल १८ किल्ले गड भ्रमंती करणार्या, ममता या एकमेव महिला आहेत, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
ममता या निसर्गप्रेमी असल्याने, आधीपासूनच पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातून काम करीत आहेत. जवळचा असो किंवा दूरचा प्रवास असो त्या सायकलवरूनच जातात. ममता यांनी सायकलिंग आणि गिर्यारोहण या त्यांच्या छंदातून ‘पर्यावरणाचे रक्षण आणि दुर्ग स्वच्छतेचा’ ध्यास घेतला आहे. त्या गिर्यारोहक असल्याने, गड-किल्ल्यांवर भ्रमंती करताना, तेथील स्वच्छतेला विशेष प्राधान्य देतात. त्या ठिकाणी प्लास्टिक अथवा अन्य कचरा आढळल्यास तो गोळा केला जातो. गड-किल्ल्यांवर स्वच्छता राखण्यासाठी, त्यांचे प्रयत्न सुरू असतात. सध्याचे प्रदूषण आणि वातावरणातील होणारे बदल पाहता, पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनणे महत्त्वाचे आहे. ही काळाची गरज ओळखून, ममता आपला छंद जोपासत असल्याचे सांगतात.
ममता यांनी २०१६ एप्रिल महिन्यात मुंबई-गोवा हा प्रवास सायकलने केला. एप्रिल महिन्यात कडक ऊन असतानाही, त्यांनी हा प्रवास केला. ते त्यांचे पहिले एकल सायकलिंग होते. महिलांनी रात्री बाहेर पडणे असुरक्षित असते, असे मानले जाते. पण, ममता आपला व्यवसाय सांभाळून, नेहमी रात्रीच प्रवासाला सुरुवात करतात. मुंबई-गोवा या मोहिमेत ममता यांना त्यांच्या घरच्यांकडून विरोध झाला होता. पण, जेव्हा त्या गोव्याला पोहोचल्या, तेव्हा त्यांचा पहिला फोटो त्यांच्या पतीनेच फेसबुकवर पोस्ट केला. त्यांचा विरोध मावळला होता. ”महिलांनी एखाद्या गोष्टीला विरोध होत असेल आणि त्यांचा मुद्दा योग्य असेल तर त्यांनी त्याला शांतपणे तोंड दिले पाहिजे. महिलांनी स्वतःसाठी दिवसातून किमान अर्धा तास तरी वेळ द्यावा,” असेही त्या सांगतात.
ममता आपल्या छंदासोबतच कौटुंबिक जबाबदारी आणि व्यवसायदेखील योग्यरितीने सांभाळतात. महिलांची तब्येत ढासळली, तर संपूर्ण कुटुंब कोलमडून पडते. त्यामुळे महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. ममता या ‘फिट इंडिया’ हा संदेश घेऊन, सर्वत्र भ्रमंती करणार आहे. ममता यांना धावणे, सायकलिंग आणि पोहण्याची आवड आहे. ममता यांनी यापूर्वी कळवा-रायगड-डोंबिवली सायकलिंग ३५० किमी आणि रायगड ट्रेक सलग ३३ तासांत खडतर प्रवास पूर्ण केला होता. त्यांनी ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ मोहीमदेखील फत्ते केली आहे. या प्रवासात त्यांची सायकल पाच वेळा पंक्चर झाली.
त्यामुळे प्रवासासाठी आणखी वेळ लागला; पण निसर्गाने नटलेल्या सुंदर नदी, डोंगर आणि आकर्षक पुरुषाची भव्य प्रतिमा हे सर्व पाहून, त्यांचा पाय येथून निघत नव्हता. पण, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पोहोचल्याचा प्रचंड आनंद त्यांच्या डोळ्यात दिसून येत होता. ममता या सध्या ’आर्यनमॅन’ या स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेत पोहणे आणि सायकलिंग एका ठरावीक वेळेत पूर्ण करायचे असते. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते. या स्पर्धेसाठी खर्चदेखील जास्त असल्याने, ममता या स्पर्धेच्या तयारी सोबतच प्रायोजकत्वासाठी देखील प्रयत्नशील आहेत. अशा या निसर्गप्रेमी ममताला तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!