अत्त दीप भव... बुद्ध महोत्सव

    27-Feb-2024   
Total Views |
Budh Mahotsav 2024

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने महासंस्कृती महोत्सव -२०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयेजित बुद्ध महोत्सवाचे आयोजन केले होते. चेंबूर येथे सर्वोदय बुद्धविहाराच्या प्रांगणात दि. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी बुद्ध महोत्सव साजरा झाला. बुद्ध महोत्सवाची संकल्पना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे होते. महोत्सवाचे प्रमुख अतिथी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले होते. महोत्सवाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. या महोत्सवाचे अंतरंग इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ये बया तू जास्तच करू राहिलीस. बोलू दे की त्यांना. आतापर्यंत आम्हाला कुणी हे सांगितल नाय. आमची लोक बरबाद झाली. आज इथ खर कारण कळतय, खर कळतय तर तू का थांबवतीस. तुच उतर खाली. व्यासपीठाकडे माझ्या दिशेने एक-दोन जण ओरडत पुढे आले. व्यासपीठावर चढत ते मला म्हणत होते. त्यांना आयोजकांनी अडवले. पण मला त्यांच्या या वागण्याचा आंनद झाला. कारण, बुद्ध महोत्सव मुंबई उपनगराच्या चेंबूरसारख्या अतिसंवेदनशील परिसरात होता. हा महोत्सव यशस्वी होऊ देणार नाही, अशा वल्गना करणारेही सभामंडपात साळसुदपणे येऊन बसले होते. महोत्सव यशस्वी करायचा तर मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील तरच महोत्सव यशस्वी होईल, अशाही सूचना अनेकांनी दिल्या होत्या. तथागतांचा ‘धम्म’ या विषयावर परिसंवाद सुरू होता. प्रत्येक वक्त्याला १५ मिनिट दिली होती. त्यामुळे नियोजित वेळ संपली की, मी वक्त्यांना थांबवत होते. बरं वक्ते काय म्हणत होते, तर थोडी चुणूक पाहा. परिसवांदातील एक वक्ते वाल्मिकी निकाळजेंचे म्हणत होते दिवसा जय भीम आन रात्री हालालुया करतात. बुद्धाचाा धम्म हे सांगतो का? बुद्धान कधी हिंदू धर्माला शिव्या दिल्या? कधी देवाला शिव्या दिल्या? अरे काय चाललय? आम्हाला अल्ला चालतो, येसू चालतो. पण, राम नाय चालत? असं कसं?

बुद्धांनी तर करूणा आणि मंगलमैत्री सांगितली. आपण काय बुद्धापेक्षा महाज्ञानी आहोत? आपण सगळ्यांशी मैत्रीपूर्ण आदरपूर्ण वागलो तरच बुद्धाचे अनुयायी म्हणवू शकू. त्यापूर्वीही प्रो.उज्वला जाधव यांच्या सत्रात त्यांना वेळेचे नियोजन म्हणून थांबवले होते. तेव्हा त्या म्हणत होत्या की, कमळ आणि स्वस्तिक ही बुद्ध धम्माची प्रतीक आहेत. सध्याचा राजकीय पक्षही या प्रतिकांना मानतो. सध्या देश बुद्धाचे तत्वज्ञानावर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर प्रगती करत आहे, तर तिसरे वक्ते निलेश गद्रे यांनी मांडले होते की, देशाच्या संविधान कितीतरी वेळा बदलले गेले कसे बदलले गेले का बदलले गेले? संविधानातच बुद्धांचे तत्वज्ञान आहे. त्या संविधानावर म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानावरच देश चालतो. तत्वज्ञान करूणा मंगलमैत्री आणि अत्त दीप भव सांगते, तर या वक्त्यांना वेळेच्या नियोजनानुसार विनम्रपणे थांबवत होते. मात्र, मी वक्त्यांना थांबवूच नये,तर तथागतांचा धम्म परिसवांदातील प्रत्येक व्यक्तीला किमान दोन तास तरी बोलू द्या, असे माझ्याशी भांडायला आलेल्या लोकांचे म्हणणे. राष्ट्रप्रेमी आणि समरसताची कार्यकर्ता म्हणून मला आलेला अनुभव खूप आनंदाचा होता. याला तोडा त्याला जाळा, हा देश आपला नाही. ‘संविधान खतरे मे’ वगैरे म्हणणार्‍या लोकांच्या पाठी समुदाय गोळा होताना समर्थन देताना मी पाहिले होते. नृत्य संगीत वगैरे मनोरजंनाच्या कार्यक्रमाला ‘वन्समोर’ किंवा अमाप समर्थन देतानाही लोकांना पाहिले होते. मात्र, तथागतांचा ‘धम्म’ या विषयावर परखड आणि ज्वलंत राष्ट्रीय मांडणी करणार्‍या वक्त्यांना बोलू द्या, बोलू द्या म्हणणारे मी या परिसंवादातच पाहिले.असो.

समाजकल्याण साहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी या महोत्सवाला सर्वतोपरी मार्गदर्शन सहाकार्य केले. ‘भवतू सब्ब मंगलम’ आणि ‘सब समाज को साथ लिए’ म्हणत दोन दिवस हा महोत्सव दिमाखात साजरा झाला. दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सत्रामध्ये धम्मवंदना झाली, यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. महाथेरो डॉ. राहुल बोधी यांनी या महोत्सव आयोजनाचे प्रास्ताविक मांडले. मंत्री मंगलप्रभात लोढांनी बुद्धविहार धम्म आणि त्यांची समाजाला असलेली महत्त्वपूर्ण गरज अतिशय सुटसुटीत भाषेत मांडली. जगाला बुद्धाचे शांती, करूणा आणि मंगलमैत्रीचे तत्वज्ञान हवे आहे. त्या तत्वज्ञानाच्या लोकआग्रहासाठी हा बुद्ध महोत्सव आयोजित केला आहे. समाजाचा महोत्सव आहे, असे म्हणताच सभामंडपात टाळ्यांचा एकच गजर झाला. मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खुसखुशीत शैलीत महोत्वाचे महत्त्व तर मांडलेच शिवाय विरोधकांचा यथायोग्य समाचारही घेतला. उपस्थित पुज्य भंतेना रामदास आठवले आणि मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते चिवरदानरूपी धम्मदान करण्यात आले. महोत्सवामध्ये भिक्खू संघज युनायटेड बुद्धिस्ट मिशन ट्रस्टी सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल होती. दि. २४ फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर भीतगीत स्पर्धांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे नियोजन योजना ठोकळे आणि विजय मोरे यांनी केले होते. यामध्ये शेकडो स्पर्धकांतून २५ स्पर्धकांना प्रत्यक्ष स्पर्धेतभाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यामध्ये तीन विजेतेे स्पर्धक घेाषित केले गेले. त्यांनतर तथागतांचा ‘धम्म’ या विषयावर परिसवांद झाला. या सत्राचे अध्यक्षस्थान महाथेरो राहुल बोधी यांनी भूषविले.

सत्रामध्ये मुंबई विद्यापीठाच्या लाईफ सायन्स विभागाच्या एचओडी आणि सामाजिक चळवळीच्या प्रमुख कार्यकर्ता डॉ. प्रो. उज्ज्वला जाधव यांनी ‘बौद्ध धम्म एक विकसित उपासना’ यावर विचार मांडले. दुसरे वक्ते होते. अ‍ॅड. वाल्मिक निकाळजे यांनी ‘बुद्ध तत्वज्ञान आणि जगभरातले अन्य धर्म’ यावर मंथन केले, तर सामाजिक समरसता समाज अभ्यासक निलेश गद्रे यांनी ‘भारतीय संविधानाचे मूळ- बुद्ध तत्वज्ञान’ यावर विचार व्यक्त केले. त्यानंतर अरविंद निकाळजे, शरद कांबळे यांच्या नियोजनातून संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जवळ जवळ ५०० ते ६०० लोक या रॅलीमध्ये होते. रॅलीनंतर रात्री डॉ. मिलिंद शेजवळ यांचा भीमगीतांवर आधारित पुष्पा अ‍ॅकेडमीचा जलसा होता. या जलसामध्ये लोक हौसेन सहभागी झाले.दुसर्‍या दिवशी महाथेरो राहुल बोधी यांनी आशीर्वचनाने महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतरचे सत्र होते सामाजिक कार्य करणार्‍या संस्थाचा विशेष परिचय. या सत्रामध्ये एकू़ण ११ संस्थांनी त्यांच्या सेवाकार्याचा आलेख मांडला. या सत्राचे नियोजन डॉ. रवींद्र कांबळे यांनी केले होते, तर समारोप सूर्यकांत गायकवाड यांनी केले. त्यांनतर ‘मी घडलो बाबासाहेंबामुळे’ या विषयावर परिसवांद आयोजित केला होता. या परिसवांदामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर आयुष्य जगत स्वतःसोबतच समाजाचे उत्थान करणार्‍या मान्यवर व्यक्तींशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन जयभीम आर्मीचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये डॉ. संगीता अंभोरे, डॉ.राजू गोंविंदा आराख, डॉ. राजेंद्र ननावरे, डॉ.तांबे यांनी सहभाग घेतला.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण कसे जगलो, कसे यशस्वी झालो, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कसा खारीचा वाटा उचलला हे सर्व वक्त्यांनी मांडले. त्यांनतर कलाविष्काराचे सत्र होते. यामध्ये एकूण २० कलाकारांनी आपले कलासादरीकरण केले. नृत्य, गीत एकांकिका या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य या कलाविष्कारातून सादर करण्यात आले. या सत्राचे नियोजन अनुराधा रोकडे आणि उज्ज्वला दाभोळकर तसेच मनोज निर्भवणे यांनी केले होते. या सत्रानंतर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला मेळाव्याचे नियोजन स्नेहा भालेराव यांनी केले होते. तेजस्विनी रोकडे, जयश्री ओव्हाळ, शुभांगी जाधव, स्मिता कवडे याचे या मेळाव्याला सहकार्य लाभले. मेळाव्यामध्ये चार मान्यवर विचारवंत महिलांनी धम्म राष्ट्र विचार मांडले. ते पुढीलप्रमाणे अ‍ॅड. सरस्वती कदम-महिलांसाठी संविधान,धम्म अभ्यासक वीणा कांबळे धम्मसंस्कारातील आदर्श स्त्री, वेणू साबळे-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातली आजची स्त्री, डॉ. प्रो. सुनीता मगरे-यशस्वी जीवनासाठी बुद्धविचार. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाच्या महिला अध्यक्ष सीमा रामदास आठवले होत्या, तर मंचावर समीता कांबळे, प्रवीणा मोरजकर, मोरे, शुभांगी जाधव, स्मिता कवडे, तेजस्विनी रोकडे या उपस्थित होत्या. यावेळी ५६० महिला मेळाव्यामध्ये उपस्थित होत्या. या सर्व महिलांना बुद्ध महोत्सवाची आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात आली.

या सत्रानंतर डॉ. वैभव देवगिरकर यांच्या नियोजनातून समारोपाचे धम्मसन्मान सत्र आयोजित करण्यात आले. या सत्राचे सूत्रसंचालन ज्योती साठे यांनी केले. यावेळी समाजातील १५ कर्तृत्ववान पुरुष आणि १५ कर्तृत्ववान स्त्रिया, ११ उत्कृष्ट सामाजिक संस्था यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘माझे विहार आदर्श विहार’ या संकल्पनेतून मुंबई उपनगरातील सर्वोत्कृष्ट तीन बुद्धविहारांना पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्या विहारांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. भीमगीत स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांनतर शाहिर संदेश उमप यांचा आंबेडकरी विचारांचा संगीतमय जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते.दोन दिवसांचा हा महोत्सव म्हणजे धम्मबांधवांसाठी उत्सव पर्वच होते. ‘ज्ञान जागृती मनोरंजन सन्मान’ या सर्वच आयामात अत्त दीप भवचा जागर करणारा हा महोत्सव होता. इतका नियोजनपूर्ण, शांतीपूर्ण आणि वैभवशाली बुद्ध महोत्सव यापूर्वी मुंबईतचनव्हे, तर राज्यातही कधी आयोजित झाला नव्हता, असे सर्वांचे म्हणणे आहे. महोत्सवामध्ये भिक्खू संघज युनायटेड बुद्धिस्ट मिशन ट्रस्टी सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या या महोत्सवामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. त्यांना कसलाही त्रास होऊ नये, याची काळजी शासनाने घेतली होती. नाष्टा जेवणाची उत्कृष्ट सोय होती. तसेच यावेळी माहिला आर्थिक विकास मंडळ, ‘आयुष्यमान भारत योजना’, ‘मतदार नोदंणी योजना’ असे शासनाचे अनेक स्टॉल लावले होते. ‘बार्टी’तर्फे पुस्तक मेळाव्याचेही आयेाजन होते. एकंदर भवतू सब्ब मंगलमचा सुंदर अनुभव स्थापित करत हा दोन दिवसांचा बुद्ध महोत्सव साजरा झाला.


-योगिता साळवी



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.