नवी दिल्ली : 'आदित्य एल १' व 'चांद्रयान ३' यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (इस्त्रो) नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्त्रो आज दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी 'GSLV-F14' या प्रक्षेपकाच्या मदतीने सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करणार आहे.
दरम्यान, 'INSAT-3DS' या हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारा हा उपग्रह या मोहिमेच्या माध्यमातून अवकाशात पाठविण्यात येणार आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात झेप घेईल. या उपग्रहाचे वजन २हजार २७४ किलो असणार आहे.
विशेष बाब म्हणजे 'INSAT-3DS' या उपग्रहास खास टोपणनावदेखील देण्यात आले आहे. सदर उपग्रहास 'नॉटी बॉय' असे टोपणनाव देण्यात आले आहे. एकंदरीत, याच 'नॉटी बॉय'च्या माध्यमातून आगामी काळात देशाला अचूक हवामान अंदाज बांधता येणार आहे.