मिलिंद देवरांनंतर आता अशोक चव्हाणांनीही काँग्रेसला रामराम केल्यापासून, महाराष्ट्र काँग्रेसमधील अस्वस्थता उफाळून आली. काँग्रेसफूटीसाठी सर्वस्वी नाना पटोलेच जबाबदार असल्याचा पक्षांतर्गत सूरही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. काही प्रमुख नेत्यांनी नानांबाबतची नाराजी सोनिया गांधींचे दूत रमेश चेन्नीथला (महाराष्ट्र प्रभारी) यांच्या कानावरही घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी नानांचा पत्ता कापला जाईल, ही शक्यताच अधिक. पण, इतक्या उंचीच्या (फक्त शारीरिक) नाना पटोले यांना घरातूनच विरोध का होऊ लागला, याचा मागोवा घेतला असता, त्याचे उत्तर त्यांच्या स्वभावगुणातच सापडते. कोणत्याही पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा नेते आणि कार्यकर्त्यांना जोडणारा थेट दुवा. चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, अगदी विरोधातील जयंत पाटील यांची नावे उदाहरणादाखल घेता येतील. पण, नाना पटोलेंचा स्वभाव तसा नाही. प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची मिळाल्यापासून त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांना दुखावलेच; पण कार्यकर्त्यांनाही हीन दर्जाची वागणूक देण्यास सुरुवात केली. कोणी तळमळीचा कार्यकर्ता त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेल्यास, त्याचे म्हणणे ऐकून न घेता, थेट उपमर्द केला जातो. दुसरीकडे नेत्यांशी संवाद नाही. आपल्याच नेत्यांना पटोले अडचणीत आणतात, असाही आरोप त्यांच्यावर होते. किंबहुना, महाराष्ट्रातील नेत्यांच्या चुगल्या ते हायकमांडकडे करतात, अशी राजकीय चर्चा त्यांच्या पाठीमागे सर्रास ऐकायला मिळते. नाशिक पदवीधरची निवडणूक ही पटोलेंच्या मनमानी कारभाराचे सर्वोत्तम उदाहरण. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी, त्यांनी सत्यजित तांबेंना उमेदवारी नाकारली. हा निर्णय काँग्रेसच्या अंगलट आला. भाजपच्या समर्थनामुळे सत्यजित निवडून आले आणि देशभरात काँग्रेसची शी-थू झाली. थोरात आणि पटोले यांच्यात कायमचे वितुष्ट आले, ते वेगळेच. आशिष देशमुख नाना पटोलेंवर रोष व्यक्त करीत बाहेर पडले. नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्याशी त्यांचे भांडणही सर्वज्ञात. पटोलेंनी विश्वासात न घेता दिलेला, विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा मविआच्या पतनास कारणीभूत ठरला. हे लक्षात घेता, पक्षश्रेष्ठी पटोलेंवर विश्वास कायम ठेवतात की खांदेपालट करतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि पाठोपाठ अशोक चव्हाण यांच्या रुपाने मोठा तडाखा बसल्यामुळे, काँग्रेस सैरभैर झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखी आपल्या पक्षाची स्थिती होते की काय, अशी शंका अनेक काँग्रेसींना सतावत आहे. अशोक चव्हाणांच्या संपर्कात आणखीन काही काँग्रेस आमदार आहेत, याची कुणकुण लागल्यामुळे, सोनिया गांधींचे दूत रमेश चेन्नीथला लगोलग महाराष्ट्रात धावून आले. त्यांनी आधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली. पण, एकही नेता काँग्रेसला या संकटातून तारू शकणार नाही, याची त्यांनाही खात्री पटली. बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंसह बहुतांश नेत्यांना एकमेकांची उणीदुणी काढण्यात अधिक रस, हे लक्षात येताच, त्यांनीही तातडीने शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आमदारांना कसे रोखावे, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनवणी चेन्नीथला यांनी पवारांकडे केली. त्यामुळे पवारांच्या भुजांवर मुठभर मांस चढले. काँग्रेस पुन्हा आपल्या पायाशी आल्याचा अतीव आनंद त्यांना झाला असावा. मग काय, पवारांनीही विद्यमान प्रदेश कार्यकारिणीत बदल करा, आमदारांना पक्षांतर्गत जबाबदार्या द्या, पदाधिकार्यांना एकसंध ठेवण्यासाठी शिबिरांचे आयोजन करा, सर्वसमावेशक नेतृत्वाच्या हातात पक्षाची धुरा द्या, अशी काही सूचना केल्या. पण, ज्यांनी एकेकाळी काँग्रेस फोडली; किंबहुना काँग्रेसचा वापर करून, स्वत:चा वेळोवेळी राजकीय स्वार्थ साधला, त्या शरद पवारांच्या पायाशी काँग्रेसला पुन्हा लोटांगण घालावे लागते, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. काँग्रेसला मार्गदर्शन करणारा, ज्याचा शब्द सर्वांसाठी प्रमाण असेल, असा एकही नेता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आजघडीला नाही, असाच यामागचा अर्थ. त्यामुळेच पक्षाची पुढची दिशा ठरविण्यासाठी काँग्रेसला पवारांच्या पाया पडावे लागत आहे.खुद्द शरद पवारांचा स्वतःचा पक्ष फुटला, चिन्हही हातचे गेले. अजितदादांचे बंडही त्यांना रोखता आले नाही. पण, तरीही पवारांच्या पंखाखाली जाण्याची काँग्रेसवर वेळ यावी, हीच एक शोकांतिका. त्यातच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या अफवाही पवारांनी काल नाकारल्या. त्यामुळे पवारांच्या लेखी काँग्रेसचे मोल ते काय, हे लक्षात यावे. पण, ते म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार, तशीच सध्या महाराष्ट्र काँग्रेसची गत!
सुहास शेलार