भारत व युएईमधील बीआयटी करार गुंतवणूकीसाठी परिणामकारक ठरणार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व युएई अध्यक्ष यांच्यातील 'बायलॅटरल इन्व्हेसमेंट ट्रीटी' काल युएईत संपन्न
भारत व युएईमधील आर्थिक भागीदारीची नवी सुरुवात
मुंबई: काल युएई व भारत यांच्यातील मैत्रीचा एक नवीन अध्याय पुढे सरसावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व युएई अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयन यांच्यात' बायलॅटरल इन्व्हेसमेंट ट्रीटी' हा करार निश्चित झाला आहे. सामाजिक राजकीय मैत्री व्यतिरिक्त भारत युएई मधील आर्थिक देवाणघेवाण व आंतरदेशीय गुंतवणूकीला चालना देण्यासाठी हा बीआयटी करार संपन्न झाला आहे. यावर बोलताना विदेश मंत्रालयाने हा करार दोन्ही देशांत गुंतवणूक वाढवण्यासाठी चालना देईल असे यावेळी निवेदनात स्पष्ट केले आहे, तसेच हा बीआयटी करार दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारी घट्ट करेल असेही यात म्हटले गेले आहे.
मागील महिन्यात कॅबिनेट बैठकीत हा कराराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. युएई व भारतातील गुंतवणूक वाढवताना डायरेक्ट व विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी या कराराचा प्रस्ताव मंजूर केला गेला होता. या गुंतवणूकीखेरीज केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादनवाढीसाठी 'आत्मनिर्भर भारत' योजनेवर देखील भर देण्यासाठी कटिबद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत व मध्य पूर्व देशातील संबंध मोदी सरकारने घट्ट केले होते.
गुंतवणूकीबरोबरच यातून उद्योग निर्मिती वाढत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीवर भारत सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. याखेरीज भारत व युएई मधील फिनटेक क्षेत्रात देखील भागीदारी करणार असल्याचे यावेळी मोदींनी स्पष्ट केले आहे. लवकरच भारतातील युपीआय डिजिटल पेमेंट प्रणाली युएई येथेही लागू करण्यात येईल. याखेरीज डिजिटल पायाभूत सुविधा, क्रुड तेल, रिन्यूएबल एनर्जी अशा विविध विषयांवर दोन्ही देशांतील सहकार्याबद्दल सामंजस्य करार झाला आहे.