मुंबई : ‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ( CM ) म्हणून शपथ घेतो की...’ हे दृढनिश्चयी स्वर कानावर पडताच ऐतिहासिक आझाद मैदानात एकच आवाज घुमला... जय श्रीराम! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते. तेव्हा शेजारच्या व्यासपीठावरील साधुसंतांचे आशीर्वचन कानी पडत होते. तर, समोर उपस्थित जनसमुदाय कृतार्थ भावनेने प्रभू रामचंद्रांचा जयघोष करीत होता. प्रभू श्रीराम वनवासातून परतल्यानंतर अयोध्येत जशी दिवाळी साजरी झाली, तसेच वातावरण गुरुवार, दि. ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पाहायला मिळाले. तिसर्या देवेंद्र पर्वाची औपचारिक सुरुवात झाली.
भगव्या जनसागराच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने शपथविधी सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे आणि अजित आशाताई अनंतराव पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधुसंतांच्या व्यासपीठावर जाऊन संतांचा आशीर्वाद घेतला. ठीक ५.२१ वाजता देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर दाखल झाले. तेव्हा त्यांच्यासोबत मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही होते. महायुतीचे तिन्ही नेते व्यासपीठावर दाखल होताच, उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर, ठीक ५.३१ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. तोवर, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह व्यासपीठावर सर्व नेतेमंडळी आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले होते. पंतप्रधानांचे आगमन होताच राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताचे गायन झाले आणि राज्यपालांच्या परवानगीने शपथविधीचा मुख्य सोहळा सुरू झाला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’च्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुर्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुर्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसाहाय्य देण्याची विनंती केली होती.
अद्भुत, अविस्मरणीय सोहळा
संत-महंत, राजकारणातील दिग्गज नेते, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, क्रिकेटपटू, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार या अद्भुत, अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, रामदास आठवले यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि तब्बल २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत आणि राधिका अंबानी, प्रणय अदानी, नोएल टाटा, दीपक पारिख, अजय पिरामल, उदय कोटक, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर आदी उद्योग जगतातील मान्यवर उपस्थित होते. त्याशिवाय, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय, रणबीर कपूर, रणवीर सिंग, रोहित शेट्टी, बोनी कपूर, एकता कपूर, श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शाह हे बॉलिवूड स्टारही सोहळ्याला हजर होते. भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर यांच्यासह या सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी चार हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.
आईने केले मायेचे औक्षण
शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर दाखल होण्यापूर्वी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता यांनी त्यांचे औक्षण केले. आईकडून मायेचे औक्षण करवून घेत, आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ करत असल्याची ग्वाहीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याआधी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीबाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर, मुंबईची ग्रामदेवता आई मुंबादेवीचे दर्शन घेतले. या देवदर्शनानंतर सागर बंगल्यावर ‘राज्यमाता’ सर्वदेवमयी गोमातांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.
शपथविधीपूर्वी गोमातेचे पूजन
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गोमातेचे पूजन केले. गोमातापूजनातून आपल्या भारतीय संस्कृतीचा गाभा अधोरेखित होतो. देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी महायुती सरकारने देशी गायीला नुकतेच राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित केले होते. त्यामुळे शपथविधीपूर्वी फडणवीसांनी केलेल्या गोपूजनाने अनेकांचे लक्ष वेधले.
‘मराठी पंतप्रधान’ म्हणून पाहण्याची इच्छा
अत्यंत अद्भुत अतुलनीय आणि अविस्मरणीय असा क्षण होता. खर्या अर्थाने लोकशाहीच्या मनातील सरकार आणि मनातील मुख्यमंत्री प्रतिष्ठापित झाले आहेत. देव, धर्म, देश, गौ, गंगा, गायत्री आदींची सेवा या सरकारच्या माध्यमातून घडत राहो, राष्ट्रपुरुषांचे रक्षण होत राहो, लोकांचे कल्याण या सरकारच्या माध्यमातून होत राहो, असे शुभाशीर्वाद या सरकारला संत समाजाच्यावतीने मी देतो. येत्या काळात देवेंद्र फडणवीस यांना मराठी पंतप्रधान म्हणून पाहण्याची सुद्धा आमची इच्छा आहे.
महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे
देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभो!
महायुती सरकारला आशीर्वाद देण्यासाठी अनेक संत-महंत उपस्थित होते. अयोध्येचे महंत राकेश उपाध्याय यांनीही उपस्थिीत राहून आशीर्वाद दिला. केंद्र आणि राज्यातील सरकार एकत्र मिळून देशाचा विकास करीत आहेत. आम्ही प्रभू श्रीरामचंद्र यांच्याकडे हीच प्रार्थना करू की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभो. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही आज या सोहळ्याचे साक्षीदार झालो. जितके चांगले काम महाराष्ट्राचे शासन करीत आले आहे, तसेच यापुढे करत राहील, ही आम्हाला आशा आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांच्या सहयोगाने काम करत राहो, यासाठी सदिच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली. तसेच, महंत डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे यांचे नाव या यादीत विशेष उल्लेखनीय आहे.