मी नाराज नाही! आधीपेक्षा जास्त जोमाने पक्षासाठी काम करणार
आमदार गोपीचंद पडळकर : हिंदुत्व आणि हिंदु धर्मासाठी पुर्णवेळ काम करणार
18-Dec-2024
Total Views | 47
नागपूर : मी अजिबात नाराज नसून आधीपेक्षा जास्त जोमाने भारतीय जनता पक्षासाठी काम करणार आहे, अशी भावना आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी व्यक्त केली. मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, आता गोपीचंद पडळकर यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिले आहे. बुधवार, १८ डिसेंबर रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
गोपींचंद पडळकर म्हणाले की, "मी भारतीय जनता पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने मला २०२० ला विधानपरिषदेत काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचे मी सोने केले. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न मी विधानपरिषदेत लावून धरले. विधानपरिषदेच्या बाहेर रस्त्यावरची लढाईसुद्धा मी लढलो. माझा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघ आहे. परंतू, पक्षाने मला माझा मतदारसंघ सोडून जत मतदारसंघातून उमेदवारी दिली. तिथल्या जनतेने भरघोस मतदान करून मला ४० हजार मतांच्या फरकाने विधानसभेत पाठवले आहे. मी नाराज असण्याचा प्रश्न नाही. परंतू, ज्या लोकांसाठी मी काम केले त्यांच्या मला मंत्रिपद मिळावे, अशा भावना होत्या. मात्र, पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे. इथून पुढे मी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, बहुजन समाज, ओबीसी, भटके विमुक्त समाजासाठी आणि हिंदुत्वासाठी मी पूर्णवेळ काम करणार आहे."
"धनगर समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, अशा कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक आहेत. परंतू, पक्षाने विचार करूनच निर्णय घेतला असेल. आम्ही कालही पक्षासोबत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीसुद्धा संयम बाळगावा. मी नाराज नाही. पहिल्यापेक्षा जास्त जोमाने मी भारतीय जनता पक्षाचे काम करेन आणि पक्षाचा विचार तळागळात पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेईल. हिंदुत्व आणि हिंदु धर्मासाठी मी पुर्णवेळ काम करणार आहे. तसेच गावगाड्यात पालात राहणारे मायनर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी वेगळे बजेट सरकारने करावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे. यावर निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल, अशी मला मुख्यमंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे," असे ते म्हणाले.
देवाभाऊ मुख्यमंत्री झालेत हेच आमच्यासाठी महत्वाचे!
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, "देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झालेत हेच आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. गोपीचंद पडळकरच्या मंत्रीपदाचा विषय फार महत्वाचा आहे, असे मला वाटत नाही. देवाभाऊंच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.