मुंबई : ( Bhatkhalkar ) ज्या नबाब मलिकांना केंद्रीय तपास यंत्रणांनी तुरुंगांत पाठवले, त्यांना ज्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवले, ते लोक आम्हाला टार्गेट करीत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसने कायम आरक्षण संपविण्याची भाषा केली, तेच लोक आता उघडे पडले आहेत. मी आता प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे जवळपास एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास कांदिवली पूर्वचे आ. अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला विशेष संवाद...
तिसर्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे हॅट्ट्रिकची संधी आहे. यावेळी कोणते मुद्दे घेऊन मतदारांना सामोरे जात आहात?
दि. २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यांमृताच्या शुभ मुहूर्तावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आठवले गट या महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी, जवळपास दोन किलोमीटर रॅली होती. जनतेमध्ये उत्साह आहे. दहा वर्षांत केलेले काम, प्रकल्प, सामाजिक आणि वैयक्तिक समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यामुळे जवळपास एक लाख मतांनी निवडून येईन, अशी परिस्थिती आहे.
‘व्हिजनरी नेता’ म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. कांदिवली पूर्वसाठी व्हिजन काय असणार आहे?
पाच वर्षांत ‘आकुर्ली सबवे’चे रुंदीकरण हा प्रकल्प हे चॅलेंजिंग काम तीन वर्षात पूर्ण केले. मुंबईत वाहतूक आणि पार्किंग या दोन प्रमुख समस्या आहेत. कारण, वाहनांची संख्या वाढत आहे. देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाढत असल्याने लोकांची आर्थिक स्थिती उंचावत आहे. त्यामुळे दोन कल्पना माझ्याकडे आहेत. एक म्हणजे अडीच वर्षांतील महायुतीच्या सरकारने ‘मेट्रो’, ‘अटल सेतू’, ‘कोस्टल रोड’, ‘वांद्रे ते विरार सी-लिंक’वर काम सुरू केले आहे. त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर डीपी रोड तातडीने उघडले पाहिजे. त्यातील अतिक्रमणे नष्ट करून बाधितांचे याच विभागात पुनर्वसन करून डीपी रोड उघडले, तर फिडर रोड अधिक वेगवान होतील, हा माझा पहिला संकल्प आहे. दुसरे म्हणजे ‘मेट्रो’ स्टेशनमध्ये दोन-तीन मिनिटाला गाडी येते. मात्र, तेवढी गर्दी दिसत नाही. कारण, तिथे बरेच आऊटलेट तयार केले आहेत. तसे रेल्वे स्थानकांच्या परिसरात या दृष्टिकोनातून आतबाहेर येणे-जाणे, पार्किंग, खासगी वाहतूक या सर्व दृष्टीने त्या स्थानकाच्या पूर्व, पश्चिमचा डीपी प्लॅन केला पाहिजे. लोकांना सवलत देऊन त्या भागाचा विकास करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत योजने’तून मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके विकसित होत आहेत. मालाड आणि कांदिवलीच्या विकास कामांना सुरूवात केली आहे. रेल्वे आपल्या हद्दीतील कामे करते. मात्र, तिथून बाहेर पडल्यावर महापालिकेची हद्द सुरू होते. त्यामुळे मी याच दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करीत आहे. त्याचप्रमाणे अंडरग्राऊंड पार्किंग वाढविण्याची गरज आहे.
पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत. मात्र, झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडविण्याचा कसा प्रयत्न केला जात आहेत?
‘झोपडपट्टी पुनर्विकास योजने’मध्ये लोकांना विश्वासात घेऊनच हे पुनर्वसन केले पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. २०११ सालचा कायदा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला. या पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोना महामारीच्या काळात गणिते कोलमडली. त्यामुळे येणार्या काळात राज्य सरकारचे अधिक योगदान करून झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि झोपडपट्टीवासियांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणे या दोन्हीवर आम्ही काम करीत आहोत. तसेच, लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पांना गती देणार आहोत.
तुमच्याविरोधात महाविकास आघाडीने कालो बुधेलिया यांना उमेदवारी दिली आहे. त्याच्या आव्हानाकडे कसे बघता?
निवडणुकीत आम्ही कोणालाही कमी लेखत नाही. मनसे, बसपा, काँग्रेसने उमेदवार दिला आहे. भाजप आणि माझा विजय निश्चित असल्याने लीड किती असणार हा लोकांच्या औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे मी एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येईन, असे वाटते.
मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द-शिवाजीनगरमधून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून भाजपला टार्गेट केले जात आहे. त्याबाबत काय सांगाल?
ज्या नवाब मलिकांना केंद्रीय तपास यंत्रणांनी तुरुंगात टाकले, त्यांना मंत्रिपदावर ज्यांनी कायम केले, ते आम्हाला टार्गेट करत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला, ही वस्तूस्थिती आहे. पण, त्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजप हा शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार आहेत. विरोधकांनी आम्हाला टार्गेट करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, हे आमचे सांगणे आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘फेक नॅरेटिव्ह’ आणि ‘व्होट-जिहाद’चा फटका बसला. त्याबाबत कशी खबरदारी घेतली जात आहे?
‘फेक नॅरेटिव्ह’ फार काळ चालत नाही. आरक्षण काढून घेणार, संविधान बदलणार हे खोटे असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचे खोटे व्हिडिओ, खोटी विधाने तयार केली असल्याचे समोर आले आहे. हे आता चालणार नाही. उलट राहुल गांधीच अमेरिकेत म्हणाले की, “आम्ही आरक्षण संपवू.” नाना पटोलेंनी त्याची री ओढली, राहुल गांधी चुकीचे म्हणाले नाहीत. “योग्य वेळ आल्यावर आम्ही आरक्षण संपवू,” असे राहुल गांधी म्हणत आहेत. त्यामुळे, राहुल गांधी, काँग्रेसने कायम आरक्षण संपविण्याची भाषा केली, हे आता उघडे पडले आहेत. त्यामुळे ‘फेक नॅरेटिव्ह’चा मुद्दा उपस्थित होणार नाही. जनता आता जागृत झाली आहे.