मुंबई : "माहिममध्ये अशा प्रकारची लढत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले. परंतू, शेवटी यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आम्ही मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊनच आमची भूमिका ठरवू," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. माहिममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे तिथे यंदा तिरंगी लढत होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "माहिममध्ये अशा प्रकारची लढत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले. परंतू, शेवटी यावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता सदा सरवणकर आणि अमित ठाकरे हे दोघेही लढणार आहेत. यासंदर्भात आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांसोबत बसून अजून काही करता येईल का, यासाठी प्रयत्न करु."
"मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या पक्षांच्या बंडखोरांशी चर्चा केली असून त्यातील ९० ते ९५ टक्के लोकांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. २ ते ३ टक्के लोकांसंदर्भात महायूती म्हणून आम्ही निर्णय घेऊ. कुठल्याही पक्षाचा उमेदवार असला तरी तिन्ही पक्ष महायूतीच्याच उमेदवाराच्या मागे उभे राहतील. भाजपची मानसिकता काय आहे, हे मी सांगितलं आहे. आम्ही महायूतीमध्ये काम करत असल्याने आम्हाला महायूती म्हणूनच भूमिका घ्यावी लागेल. मुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच आमची भूमिका ठरेल," असे ते म्हणाले.
गोपाळ शेट्टींचा मला अभिमान!
"गोपाळ शेट्टी हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते पक्षासाठी त्याग करतील, अशी मला पहिल्या दिवसापासूनच मनातून खात्री होती. एखादी गोष्ट मनाला पटली नाही तर ते थेट सांगतात. त्यामुळे त्यांनी फॉर्म भरून एकप्रकारे पक्षाला थेट सांगितलं की, तुम्ही एकतर्फी विचार करू नका. दरवेळी नेत्यांचा विचार करू नका, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यानंतर आमच्याशी झालेल्या बैठकांमध्ये त्यांनी त्यांच्या मनातली भूमिका सांगितली. तसेच मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही असे सांगून त्यांनी अर्ज मागे घेतला. गोपाळ शेट्टींसारख्या कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे," असेही फडणवीस म्हणाले.