देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; सावनेरमधील अवैध धंद्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद
19-Nov-2024
Total Views | 35
नागपूर : “सावनेरमधील अवैध धंद्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे. सुनील केदार यांच्या कार्यकाळात विकासाचे नाही, तर दादागिरीचे राजकारण झाले,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) केली आहे. सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सावनेर येथील भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, विकास समजणारा लोकप्रतिनिधी निवडा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गडकरी यांच्या नेतृत्वात आम्ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला. वेगवेगळ्या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात कामे केली. नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघ येतात. यातील सावनेर हा सर्वात मागास राहिलेला मतदारसंघ आहे. कारण इथल्या आमदारांना माहीत होते की, मी विकास केला तर नागरिक प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यांना दाबून ठेवले. इथे विकासाचे नाही, तर दादागिरीचे राजकारण झाले. सुनिलबाबूंनी इथे सट्याचा, पट्याचा, रेतीचा, चोरी चकारीचा रोजगार दिला. चांगल्या घरच्या पोरांना कामाला लावून त्यांचे जीवन खराब करण्याचे काम इथे झाले. त्यामुळे आज इथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होताना दिसत आहेत. माझ्या पोलिसांना सर्वात जास्त त्रास सावनेर मतदारसंघात आहे. कारण या धंद्यांना लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद आहे. परंतु, हे कुठेतरी संपवायला हवे. नागपूर जिल्हा विकासाकडे जात असेल तर सावनेरही विकासासोबत गेला पाहिजे. त्यामुळे ज्याला विकास काय आहे हे समजते, असा लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला हवा,” असे आवाहन त्यांनी केले.
परिवर्तनाची हीच ती वेळ
“आपल्या सगळ्या लोकांनी यासाठी आंदोलन केले. त्यामुळे आमची बँक बुडवल्याबद्दल सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि आज ते जामिनावर बाहेर आहेत. पुढची पाच वर्षे ते निवडणूक लढवू शकणार नाहीत. पण आता त्यांनी वहिनींना समोर केले. समजा त्या निवडून आल्या, तर आमदार म्हणून त्या काम करतील की सुनीलबाबू करतील? त्यामुळे परिवर्तनाची हीच ती वेळ आहे,” असे आवाहन फडणवीसांनी केले.
बँकेचा घोटाळा कोणी केला?
ते पुढे म्हणाले की, “ज्या जिल्ह्यांच्या जिल्हा बँका जीवंत आहेत, तेच जिल्हे राज्यात पुढारले. पुणे, सातारा येथील जिल्हा बँक स्वतःच्या भरवशावर शून्य टक्के व्याजावर तीन लाखांपर्यंत कर्ज शेतकर्याला देते. यासोबतच, कारखान्याला 100 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊन मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्रातले कारखाने उभारते. पण नागपूरची अवस्था काय आहे? या जिल्ह्यात कृषीवर आधारित अर्थव्यवस्था पूर्णपणे संपली. या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे? गरिबाच्या हक्काचे हे शेकडो कोटी रुपये घेऊन बँकेचा घोटाळा कोणी केला?” असा सवालही त्यांनी केला.