मुंबईचा सुनियोजित विकास, ही आपली गरज! : आशिष शेलार
17-Nov-2024
Total Views |
मुंबई : मुंबईचा सुनियोजित विकास, ही आपली गरज असून पुढच्या पाच वर्षांचे पूर्ण व्हिजन तयार आहे, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा वांद्रे पश्चिम विधानसभेचे उमेदवार आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै.‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला खास संवाद.
तुमच्या कवितांची बरीच चर्चा असते. त्यातून तुम्ही कायमच विरोधकांवर अचूक निशाणा साधत असता?
मी एक उत्कृष्ट वाचक आहे. वकील असल्यामुळे उत्तम निरीक्षकसुद्धा आहे. मी मराठी शाळेत शिकलो, याचा मला अभिमान आहे. या सगळ्या गोष्टी मला सहज सुचतात आणि मी त्या मांडतो. अंतिम स्वरूप देण्यासाठी आवश्यक असल्यास मी माझ्या मित्रांशी बोलतो. पण, सर्वसाधारणपणे सर्व कविता माझ्याच असतात.
तुम्ही थेट मतदारांच्या भेटी घेत आहात. कसा आहे मतदारांचा प्रतिसाद?
यावेळी मतदारांनी मन बनवले आहे. माझा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांमध्ये मी गेलो आहे. संपूर्ण मुंबईत मतदारांनी आता विषयांना समजून घेऊन मुद्दांवर मतदान करायचे आणि फेक नॅरेटिव्हपासून लांब राहायचे ठरवले आहे. भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करत आहेत. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी अडीच वर्षांत केलेले काम आणि त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांनी दिलेली स्थगिती या सगळ्यातून जनतेच्या मनात स्पष्टता आली आहे. महाविकास आघाडीला मत देणे म्हणजे विकास थांबवणे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जनतेशी संवाद साधल्यावर त्यांची प्रतिक्रिया स्पष्ट दिसते आणि माझ्याबद्दल प्रचंड मोठी विश्वासार्हतेची लाट दिसत आहे.
सज्जाद नोमानी यांनी व्हिडिओद्वारे म्हटले की, आमचा निशाणा केवळ महाराष्ट्रच नाही, तर दिल्ली आहे. त्यावर काय सांगाल?
सज्जाद नोमानी यांचा मी व्हिडिओ टाकला आणि काव काव, डराव डराव करणारे सगळे ओरडू लागलेत. परंतु, सज्जाद नोमानी यांनी त्या व्हिडिओमध्ये ‘व्होट जिहाद’ आणि सिपासालार कोण याचा उल्लेख केला. त्या नेत्यांनी समोर येऊन आमचा ‘व्होट जिहाद’ला विरोध आहे, असे म्हणावे. त्यांनी स्वत: त्या तत्त्वावर उभे राहून निवडणूक आयोग किंवा पोलिसांकडे सज्जाद नोमानींची तक्रार केली पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा नाना पटोलेंना त्यांचे नाव घेतल्याबद्दल आक्षेप असल्यास माझ्यावर किंवा नोमानींबाबत काहीतरी भूमिका घेऊन आपले मत मांडले पाहिजे. पण, ते आपले मत मांडत नाहीत, याचा अर्थ त्यांना सोयीस्कररित्या एका अल्पसंख्याक समाजाच्या मतांसाठी नोमानींच्या वक्तव्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्यांची इकोसिस्टीम आता गप्प आहे. कारण त्यांचा चेहरा बुरखा फाटून पुढे आला आहे.
लोकसभेला ‘व्होट जिहाद’ झाल्याचा आरोप भाजपने केला होता. विधानसभेतही नुकसान होईल का? तो रोखण्यासाठी भाजपची काय रणनिती आहे?
मुळात मतदार हुशार आहेत. कुठल्याही वर्ग, धर्म, भाषेच्या पुढच्या पीढीला राज्याच्या विकासाबरोबर आपल्याला आणावे लागेल. आपल्याला नवनवीन उंची गाठायची आहे, असे आम्ही मुस्लीम मतदारांनादेखील सांगतो. त्यामुळे एका कद्रु आणि छोट्या मानसिकतेतून आवाहन करणार्या नेतृत्वाला आपण झुगारले पाहिजे. तसेच, आपल्या पुढच्या पिढीच्या हातात अशा गोष्टी मिळायला हव्यात, ज्यामुळे तो येणार्या शतकात जगातील सगळ्या गोष्टींसोबत स्पर्धा करू शकेल. त्यामुळे मुस्लीम मतदारांनीदेखील त्या पद्धतीचे काम करावे. ते जर करणार नसतील, तर या ‘व्होट जिहाद’ला मतांच्या धर्मयुद्घातून प्रतिकार मिळणार.
संपूर्ण मुंबईत वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. यापासून कधीपर्यंत दिलासा मिळणार?
वाहतुकीच्या तणावातून नागरिकांना सुटका मिळावी, यासाठी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढली. भाजपच्या राज्यात त्या डब्यांचा आकार आणि रचना बदलली. तसेच, प्रवाशांची संख्या कुठेतरी वळवायला हवी, यासाठी मेट्रोचे नवनवे मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहेत. याशिवाय ‘कोस्टल रोड’, ‘अटल सेतू’, ‘वांद्रे-वर्सोवा’ या कामाला गती मिळाली. हे सगळे प्रकल्प पूर्ण करून पुढच्या पाच वर्षांत महायुती मुंबईकरांना भरीव दिलासा देईन.
महाविकास आघाडी आणि विशेषतः उबाठा गटाकडून मुंबई अदानींच्या नावावर केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपाकडे तुम्ही कसे पाहता?
कंत्राटदार अदानी असो किंवा कोणीही. परंतु, त्याच्या नावाने राजकारण करणारा पहिला महाभाग उद्धवजींच्या रुपात आपण बघितला. मुंबईचा सुनियोजित विकास, ही आपली आवश्यकता आहे. ४३७ चौरस किलोमीटरच्या मुंबईतील ५३० किलोमीटरमध्ये असलेल्या या धारावीचा पुनर्विकास नियोजनपूर्ण झाला, तर मुंबईत नियोजनांच्या विकासाची गती वाढेल. याला विरोध करून काय मिळणार आहे? केवळ अदानी करतोय म्हणून विरोध? अदानींचे टेंडर उद्धव ठाकरे यांनीच तयार केले. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा हा त्यांचा कारभार सध्या सुरू आहे.
तुमच्या मतदारसंघासाठी पुढील पाच वर्षांचे व्हिजन काय?
आमचे पूर्ण व्हिजन तयार आहे. या निवडणुकीत झालेल्या सगळ्या महत्त्वाच्या सभा आणि बैठकांमध्ये ते जनतेसमोर मी मांडतो आहे. यात जनतेची सहभाग आणि त्यांच्या सूचनांना वाव देऊन त्याचे दस्तऐवजीकरण मी निवडणुकीनंतर प्रसिद्ध करेन.