१०० व्या अ.भा.मराठी नाट्य संमेलनात ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय
वंदना गुप्ते आणि सविता मालपेकर यांनी केली तक्रार
08-Jan-2024
Total Views | 24
पुणे : १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुण्यात पार पडला. ५ ते ७ जानेवारी या तीन दिवसीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि अ.भा.म.नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार उपस्थित होते. दरम्यान, या नाट्य संमेलनावेळी ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय झाल्याची तक्रार अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केली.
लेट्स अप या डिजीटल चॅनलशी बोलताना सविता मालपेकर म्हणाल्या की, “नाट्यसंमेलनात सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ कलाकारांनाही बसायला जागा मिळत नसल्याने उभं राहावं लागत आहे. ज्यांना तुम्ही तुमच्या गावात बोलावता त्यांची व्यवस्था नीट करा. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. मोहन जोशी, सुरेश खरे यांचीही गैरसोय झाली". तसेच, अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी देखील व्हिडिओत, "मी पुन्हा मुंबईला चालले आहे. मला एकही सभामंडप दिसलं नाही, सापडलं नाही. नाट्यसंमेलनासाठी मी नटून थटून आले होते. पण कार्यक्रमस्थळ न मिळाल्याने मी आता पुन्हा मुंबईला जात आहे", असा टोला लगावला.
दरम्यान, पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे आयोजित १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, मोहन आगाशे, सतीश आळेकर यांना व्यासपीठावर आमंत्रित देखील केले गेले नाही किंवा त्यांच्या इतक्या वर्षांच्या रंगभूमीवरील कामगिरीसाठी त्यांना सन्मानित देखील केले गेले नाही ही खेदजनक बाब आहे.