रसिका शिंदे-पॉल
मुंबई : ‘श्रावणक्वीन’ या स्पर्धेतून मराठी मनोरंजनसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला तो म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत हिचा. २०१० साली प्रदर्शित झालेल्या 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून पूजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘दगडी चाळ’, ‘आता गं बया’, ‘लपाछपी’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक चित्रपटांत तिने विविधांगी भूमिका साकारल्या. महत्वाती बाब म्हणजे लपाछपी या चित्रपटासाठी तिला दादासाहेब फाळके यांच्या १४९व्या पुण्यतिथी निमित्त ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार २१ एप्रिल २०१८ रोजी प्रदान करण्यात आला होता. याच हरहुन्नरी पूजा सावंत सोबत ‘दै. मुंबई तरुण भारत’ने साधलेला खास संवाद. आज २५ जानेवारी पूजा सावंतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिला कोणाचा बायोपिक करण्याची इच्छा आहे.
स्मिता पाटील यांचा बायोपिक करण्याची इच्छा
चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामं करणारी सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. त्यांनी एक दशकभराच्या कारकिर्दीत हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये बहुढंगी भूमिका साकारल्या. आजही मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नवोदित कलाकारांचा आदर्श स्मिता पाटील आहेत. अभिनेत्री पूजा सावंत हिच्यासाठी तर स्मिता पाटील दैवत आहे. त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना पूजा म्हणाली, “ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यामुळे आज खरं तर मी अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यांचे चित्रपट, कलाकृती पाहाच मी लहानाची मोठी झाले. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं ही माझ्यासाठी पर्वणी आहे, मी अक्षरश: त्यांची पूजा करते. स्मिता पाटील यांचा प्रत्येक चित्रपट मी पाहिला आहे, पण प्रामुख्याने मी आठवीत असताना त्यांचा ‘जैत रे जैत’ चित्रपट टी.व्हीवर सुरु होता. त्यांचा अभिनय मी पाहिला तेव्हा त्यांचं नाव देखील मला माहित नव्हतं. पण कालांतराने त्यांचे अनेक चित्रपट मी पाहू लागले त्यावेळी माझ्यासाठी कलेची आणि अभिनयाची व्याख्याच स्मिता पाटील झाल्या. खरं तर अभिनय क्षेत्रात येण्याचा माझा कधी विचार नव्हता, परंतु, जर का अभिनेत्री झाले तर स्मिता पाटील यांच्यासारखं काहीतरी काम करायचं हे मात्र मनाशी पक्कं केलं होतं”. पुढे पूजा तिच्या मनातील एक मोठी इच्छा व्यक्त करत म्हणाली की, “स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट जर का केला तर त्यांचीच व्यक्तिरेखा मला साकारण्याची मनापासून इच्छा आहे. ज्यावेळी त्यांचा बायोपिक होईल त्यावेळी त्यात स्मिता पाटील यांची भूमिका मी साकारावी हा माझा हक्क आहे असे मी मानते”.
स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पूजा झळकणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’चे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले असून हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.