स्टार्ट अप क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’!

    16-Jan-2024
Total Views |

MH Startup


नवी दिल्ली :
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला आहे.
 
या क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे व विवेक मोगल या टीमने पुरस्कार स्वीकारला.
 
राजधानी दिल्लीतील भारत मंडपम, प्रगती मैदान येथे “राज्यांचे स्टार्टअप रँकिंग” पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे भारत सरकारच्या उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेत, ज्यात राज्य सरकार, इनक्यूबेटर, एंजेल गुंतवणूकदार, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे. या स्टार्टअप्सच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
राज्यात स्टार्ट अप इकोसिस्टीम बळकट करणार
 
महाराष्ट्र सरकार स्टार्टअप इको सिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहायता, प्रशिक्षणआणि सल्ला सेवा, स्टार्टअप्ससाठी सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे.‍ राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्ज, भांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे.