भुवनेश्वर : भगवान जगन्नाथ धाम पुरीमध्ये हेरिटेज कॉरिडॉर अंतर्गत पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या परिक्रमा मार्गाचे उद्घाटन आज दि. १७ जानेवारी रोजी होणार आहे. पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंग देब हे या विधीचे मुख्य यजमान आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण ओडिशामधून भाविकांना सरकारी खर्चाने आणले जाणार आहे, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात येणार आहे.पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंग देब हे या विधीचे मुख्य यजमान आहेत. या परिक्रमा मार्गिकेचा उदघाटन सोहळा १५ जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. मात्र मुख्य उद्घाटन कार्यक्रम १७ जानेवारी रोजी होणार आहे. यांनतर हा परिक्रमा मार्ग सर्वसामान्य भाविकांसाठी कॉरिडॉर खुला होणार आहे.
चारधाम यात्रेत ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिराचा समावेश होतो. या मंदिरात भगवान जगन्नाथ यांच्यासह त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते. जगभरातून आणि देशाच्या कानोकोपऱ्यातून नागरिक भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांना कमी वेळेत चांगल्या पद्धतीने दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी ओडिशा सरकारने या परिक्रमा कॉरिडॉर प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्प अंतर्गत केवळ मंदिराभोवतीचा ७५ मीटर परिसर विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी मंदिरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या प्रकल्पातील उर्वरित प्रगती पथावर आहेत. उदघाटन सोहळ्यापूर्वी मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता विविध रंगांच्या रांगोळ्यांनी सजवण्यात आला आहे. जगन्नाथ मंदिर परिसराच्या आतील आणि बाहेरील सर्व मंदिरे रोषणाईने सजवण्यात आली आहेत.
कोणती विकासकामे केली?
श्रीमंदिर परिक्रमा कॉरिडॉर विकसित करण्याचा मुख्य उद्देश परिक्रमेदरम्यान भाविकांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. परिक्रमेदरम्यान, श्री मंदिर आणि मंदिराच्या नीलचक्राचे आरामात दर्शन घेता येईल. या परिक्रमा प्रकल्पाअंतर्गत मंदिराभोवती चौकोनी मार्गिका तयार करण्यात आली आहे. हा कॉरिडॉर ९ झोनमध्ये विभागलेला आहे. यामध्ये एका वेळी सुमारे ६००० भाविक एका रांगेत प्रदक्षिणा करू शकतील. इतक्या प्रशस्त कॉरीडोअरची रचना करण्यात आली आहे. श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पात ४००० भाविकांसाठी क्लॉक रूम, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, हातपाय धुण्याची सुविधा, देणगीसाठी किओस्क, बहुस्तरीय पार्किंग आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
परिक्रमा प्रकल्पात काय आहे?
७ मीटरचा ग्रीन बफर झोन
१० मीटर अंतर परिक्रमा
१४ मीटर लँडस्केप झोन
०८ मीटर बाह्य परिक्रमा
१० मीटर भाविकांसाठी सुविधा मार्गिका
४.५ मीटर सर्व्हिस रस्ता
४.५ मीटर आपत्कालीन रास्ता
७.५ मीटर मिश्र वाहतूक रास्ता
०७ मीटर फूटपाथ