मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष सक्रीय झाले आहेत. यातच जेडीएसने (जनता दल सेक्युलर) एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी दिल्ली येथे जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे.
जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात एक बैठक पार पडली. यादरम्यान जेडीएसच्या एनडीएमध्ये प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेदेखील उपस्थित होते.
एचडी कुमारस्वामी यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जेडीएस औपचारिकपणे एनडीएमध्ये सामील झाला आहे. ते म्हणाले की, आज औपचारिकपणे आम्ही भाजपशी हातमिळवणी करण्याबाबत चर्चा केली. आम्ही प्राथमिक मुद्द्यांवर औपचारिकपणे चर्चा केली. आमच्याकडून कोणतीही मागणी नाही, असेही ते म्हणाले.