लोकसभेसह विधानसभेत इतिहास घडणार - देवेंद्र फडणवीस

फडणवीसांचा दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प

    01-Sep-2023
Total Views | 42
Devendra Fadnavis News

मुंबई : महायुती म्हणून एकत्र आलेलो आम्ही मित्रपक्ष फेवीकॉल का जोड आहोत. सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय असून आमचा प्रवास एकाच दिशेने सुरू आहे. आमची स्थिती इंडी आघाडीसारखी नाही कारण आम्ही मनाने एक आहोत. येत्या निवडणुका महायुतीने एकदिलाने लढण्याची आवश्यकता असून महायुतीच्या भक्कम समिकरणामुळे लोकसभेसह विधानसभेतही इतिहास घडणार आहे," असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवार, दि. १ सप्टेंबर रोजी महायुतीच्या सर्व पक्षांची एक बैठक वरळीत पार पडली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. वरळीत पार पडलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीतील विविध घटकपक्षांचे नेते, राज्यभरातून आलेले पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महायुतीच्या २१५ हुन अधिक आमदारांनी देखील या मेळाव्याला हजेरी लावली होती. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''इंडी आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीच्या वेळी एकजुटतेचा आणि भक्कमतेचा दावा केला गेला. पण दोन दिवस झालेल्या बैठकीनंतर काढलेल्या परिपत्रकतही आम्ही शक्य असेल तोवर सोबत राहून लढू असे आघाडीने म्हटले आहे. यातूनच इंडी आघाडीची भेंडी आघाडी झाली हे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आल्या पण त्यांना कुणी खुर्ची न दिल्याने परत निघाल्या होत्या. अखेरीस त्यांना पवार साहेबानी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाही. अशाच प्रकारे पवार साहेबांनी दादांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला पण..' असे म्हणत फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या संभाव्य वाटचालीवर भाष्य केले आहे. ''आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे ? याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. आतापर्यंत ५ पक्षांनी दावेदारी ठोकली तरी त्यात राहुल गांधींचे नाव घ्यायला कुणी तयार नाही.'' असे म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवरही मिश्किल टिप्पणी केली आहे.

नीती आयोगावरून ठाकरेंना सुनावले खडे बोल

नीती आयोगाची बैठक आणि त्यावरून सुरु झालेल्या वादावर फडणवीसांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. ''नीती आयोगाच्या बैठकीवरून अनेकांनी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. आयोग शहरांचा विकास आराखडा निश्चित करण्यासोबतच आता आर्थिक प्लॅन देखील बनवण्यात मदत करणार आहे. त्यासाठी देशातील ४ राज्यातील एकूण ४ शहरे निवडण्यात आली आहेत. या बाबत त्या राष्ट्रवादीतील काही कॅमेराजीवी लोक नाटकात सहभागी झाली आहेत. मुंबईसाठीच्या अशा प्लॅनला विरोध करणारी मंडळी मुम्बईद्रोही आहेत. त्यामुळे मुंबईला तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात किंवा त्याच्या बापाच्या बापात नाही,'' असे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठी आणि मुंबईवरून राजकारण करणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांकडून मिळालेली ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल.

फडणवीसांचा दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प

महाराष्ट्रातील पावसाची स्थिती आणि संभाव्य दुष्काळसदृश्य स्थितीवरही फडणवीसांनी सरकारची बाजू स्पष्ट केली आहे. तसेच शेतकऱ्यांनाही मदतीबाबत आश्वस्त केले आहे. ''महाराष्ट्राच्या दुष्काळ प्रश्नावर आम्ही तिघे मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी दीड लाख कोटींची गरज आहे. त्यामुळे आम्ही मोदींना विनंती करणार असून या कामासाठी त्यांनी आशीर्वाद द्यावेत, सहकार्य द्यावे आणि थोडी खात्री द्यावी. अशा प्रकारचे प्रयत्न झाले तर मग आम्ही महाराष्ट्राला दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाहीत,'' असा संकल्पच फडणवीसांनी यावेळी सोडला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121