मुंबई : चांद्रयान-३ मोहिमेत अलौकिक यश मिळवल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने सुर्य मोहिमेकडे आपला मोर्चा वळवला आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ मिशन लॉन्च करण्यात येणार आहे. सुर्याचा अभ्यास करणारे भारताचे हे पहिलेवहिले मिशन असल्याने ते खास असणार आहे.
आदित्य एल-१ या मिशनमध्ये सूर्याचे तापमान, ओझोनचा थर, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, अवकाशातील हवामानाची गतिशीलता या सगळ्याचा अभ्यास केला जाणार आहे. आदित्य एल-१ मिशनचे बजेट जवळपास ४०० कोटी एवढे आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून पी. एस. एल. व्ही.(PSLV) रॉकेटच्या माध्यमातून आदित्य यान अवकाशात सोडले जाणार आहे.
पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सुमारे १५० दशलक्ष किलोमीटर आहे. ज्या ठिकाणी आदित्य एल-१ प्रक्षेपित केले जाणार आहे, ते ठिकाण पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एल-१ हे स्थान पृथ्वी आणि सुर्याच्या मध्ये आहे. याच एल-१ भोवतीच्या कक्षेतून सुर्यांचा अभ्यास करणे हा आदित्य एल-१ मोहिमेचा उद्देश आहे. याठिकाणी पोहोचण्यासाठी आदित्य एल-१ ला १२० दिवसांचा कालावधी लागणार आहे.
सूर्याचे वय सुमारे ४५० दशलक्ष वर्षे असल्याचे मानण्याच येते. सूर्य पृथ्वीपासून १५ कोटी किमी अंतरावर आहे. सुर्याचे गर्भातील तापमान १५ दशलक्ष अंश सेल्सिअस तर बाह्य आवरणाचे तापमान ५५०० अंश सेल्सिअस एवढे आहे. सुर्याची जडणघडण व सुर्यमालेतील ग्रहांना समजून घेण्यासाठी सुर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
आदित्य एल-१ नाव का?
इस्रोने आपल्या सूर्य मोहिमेला आदित्य एल-१ असे नाव दिले आहे. एल-१ म्हणजे 'लांग्रेज पॉईंट' (Lagrange point). असे ठिकाण जिथे सुर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शुन्य प्रभाव असतो किंवा असा बिंदू जिथे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव संपतो आणि तिथून सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती सुरू होते. या स्थळांना लांग्रेज पॉईंट असे म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच लांग्रेज पॉईंट (एल-१, एल-२, एल-३, एल-४, एल-५) आहेत. एल-३ सूर्याच्या दुसऱ्या बाजूला आहे, त्यामुळे वैज्ञानिकांना त्याचा काहीही उपयोग नाही. एल-१ आणि एल-२ पृथ्वीच्या जवळ आहेत. यापैकी एल-१ पॉईंट सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सर्वात योग्य आहे. यामुळे इस्रो आपले अंतराळ यान एल-१ पॉइंटवर पाठवत आहे.