‘मिशन चांद्रयान’: धूर-जाळ

    24-Aug-2023   
Total Views |
Prakash Ambedkar on Chandrayan 3

‘मिशन चांद्रयान-३’च्या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आपला देश चंद्रावर जाऊन परत येईल, हे अभिमानस्पद आहे. मात्र, जातीय विषमता, गरिबी, बेरोजगारी वगैरे यांचे काय?” तसेच, प्रकाश यांची मुख्य खंत पाहू. ते म्हणाले की, ‘’मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतातील वंचित आणि बहुजन समाजाचे राक्षसीकरण करत आहेत.” खरेच वंचित आणि बहुजन समाज इतका मूर्ख आणि लेचापेचा आहे का? की एखादा राजकीय पक्ष त्यांचे राक्षसीकरण करू शकेल? बहुजन समाजाला मूर्ख ठरवून प्रकाश यांनी समाजाचा अपमान केला आहे.उपेक्षित समाजाचे आपणच कैवारी असल्याच्या थाटात प्रकाश नेहमीच जातीपातीचा उल्लेख करीत असतात. त्यांच्या मुखात सदासर्वदा आलुतेदार समाज, बलुतेदार समाज ही वाक्ये असतात. आलुतेदार आणि बलुतेदार जातीबाहेरचे समाज आहेत का? मुळात जातीअंताची लढाई लढणार्‍याच्या सर्व स्तराची, घटकातली माणसं केवळ माणसंच असायला हवीत. ‘हा नवबौद्ध...तो चर्मकार...तो मातंग हा मराठा आणि तो ब्राह्मण...’ अशी शेलकी वर्गवारी नसावी. यानुसार प्रकाश सर्वांना समान मानतात का? की अशी वर्गवारी करतात? याचे जे उत्तर आहे ना तेच पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांना छेद देणारे आहे. तसेच, १९५० पासून देशात संविधानाचे राज्य आहे. बाजूच्या पाकिस्तानची वाताहत पाहा आणि आपल्या देशाची प्रगती पाहा. पण, कोल्ह्याला द्राक्षे अप्राप्य असल्याने आंबट वाटत असतील तर? त्याप्रमाणेच भारतीयांना अभिमान वाटावा, असा क्षण भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत अनुभवता आला, याबद्दल विरोधी पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना वाईट वाटत असेल तर? खरे तर वैचारिक मतभेद एका बाजूला आणि राष्ट्रीय अस्मिता एका बाजूला. दुर्देव सत्तेत नसलेले नेते हा विचार करत नाहीत. विरोधी पक्षाची मानसिकता घेऊन ते चांगल्या कार्यालाही विरोध करतात. त्याला पर्याय नाही. त्यांना असेच जळू द्यावे, कुढू द्यावे. त्याचवेळी ’चांद्रयान’ मोहिमेबद्दल प्रत्येक खर्‍या भारतीयाला (मी खर्‍या भारतीयाला लिहिले आहे, याची नोंद घ्यावी) अभिमान आणि आनंद वाटत आहे. बाकी ‘मिशन चांद्रयाना’बद्दलचा धूर आणि जाळ दुर्लक्ष करू नका.


जेएनयु ते जादवपूर विद्यापीठ

'मी समलैंगिक नाही,’ म्हणत नादिया जिल्ह्याच्या स्वप्नदीप कुंडू या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने नग्नावस्थेत जादवपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारली आणि मृत्यू पावला. स्वप्नदीपचे एक पत्रही मिळाले आहे. त्यात लिहिले आहे की, विद्यापीठातील सिनिअर विद्यार्थी त्याला धमकी द्यायचे की, त्यांचे सगळे म्हणणे ऐकणे आणि गांजा पिणे आवश्यक आहे. ते रॅगिंग करायचे. भयंकर! अंगावर एकही कपडा नाही आणि मी समलैंगिक नाही, असे म्हणताना त्याने जेव्हा मरण्यासाठीच छतावरून उडी मारली, त्यावेळी त्याची मनस्थिती काय असेल? शब्दातीत दुःखद.काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बाबुल सुप्रियो तेव्हा भाजपमध्ये होते. अभाविपच्या कार्यक्रमासाठी ते जादवपूर विद्यापीठामध्ये आले होते. तेव्हा विद्यापीठातील मार्क्सवादी कम्युनिस्ट, तृणमूल काँग्रेस पक्ष आणि याच गोतावळ्यातील सर्वच डाव्या पक्षांच्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी ते भाजपचे नेते म्हणून त्यांना मारहाण केली. याच घटनेनंतर काही दिवसांनी जादवपूर विद्यापीठामध्ये मी गेले होते. विद्यार्थ्यांना दुर्गापूजेची रजा होती. विद्यापीठात विद्यार्थी नसतील असे वाटले. पण, धुराची वलय नव्हे, तर धुरांडे सोडत विद्यार्थी तिथे बसलेले. विद्यार्थी म्हणावे तर वय वर्षे ५० असेल, असेही लोक बसलेले. जादवपूर विद्यापीठाने आपल्याला आंदणच दिली आहे, अशा आविर्भावात सर्वच डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना वागत होत्या. त्यांची मग्रुरी आणि मुजोरी पाहण्यासारखी होती. याबद्दल काही विद्यार्थी म्हणाले की, ’इथे काही प्राध्यापकच विद्यार्थ्यांना पहिला पेग ऑफर करतात.’ मार्क्सवाद डावी विचारसरणी मुक्तता सांगते. काय ठेवले धर्म आणि नीतीनियमांमध्ये? समाजाच्या चालीरितीमध्ये? असे विद्यार्थ्यांच्या मनात रूजवतात. मजेमजेची सवय लावतात म्हणून हे गुरूजन विद्यार्थ्यांना प्रिय होतात. गुरूंनी सूचवलेल्या विद्यार्थी संघटनेचे ते कट्टर कार्यकर्ता होतात. हे सगळे पाहून वाटते जेएनयुसारखे जादवपूर विद्यापीठाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पण, सध्या तिथे ममतांचे तृणमूल सत्तेत आहे. जादवूपर विद्यापीठामधील विघातक शक्तींना दूर करण्यासाठी तृणमूलसह कम्युनिस्ट हटावचे लक्ष यशस्वी करणे गरजेचे आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.